एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना १० एप्रिलनंतर व्हॅक्सिनेशन सक्तीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:08 AM2021-04-08T04:08:11+5:302021-04-08T04:08:11+5:30
नागपूर : एसटी महामंडळातील वाहक, चालकांना १० एप्रिलनंतर कोरोना व्हॅक्सिनेशन सक्तीचे करण्यात येणार आहे. महामंडळ आपल्या कर्मचाऱ्यांसाठी तपासणी मोहीम ...
नागपूर : एसटी महामंडळातील वाहक, चालकांना १० एप्रिलनंतर कोरोना व्हॅक्सिनेशन सक्तीचे करण्यात येणार आहे. महामंडळ आपल्या कर्मचाऱ्यांसाठी तपासणी मोहीम राबविणार आहे. तसेच महामंडळाची प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने राहणार असून, संपूर्ण लॉकडाऊनच्या काळातही प्रवासी सेवा सुरूच राहणार आहे.
कोरोना संक्रमणाच्या काळात महामंडळाने आरोग्याच्या दृष्टीने काही नियमावली तयार केली आहे. कामावरील कर्मचाऱ्यांनी व्हॅक्सिनेशन करून आपल्याजवळ रिपोर्ट ठेवावा, अशा सूचना आहेत. व्हॅक्सिनेशन केले नसल्यास निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट स्वत:कडे ठेवावा, तो १५ दिवसाच्या आतील असावा, अशा सूचना आहेत. प्रवासी आणि वाहक, चालकांनी मास्क लावणे बंधनकारक केले आहे. मास्क न लावणाऱ्यांकडून ५०० रुपये दंड आकारण्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रवाशांनाही हा नियम सक्तीचा करण्यात आला आहे. बसेस निर्जंतुकीकरण करण्यावरही या काळात अधिक भर दिला जात आहे.
...
८०० जणांनी घेतली लस
नागपूर विभागामध्ये २,७५० कर्मचारी एसटी महामंडळात कार्यरत आहेत. त्यात दोन हजार वाहक आणि चालकांचा समावेश आहे. नागपूर विभागामध्ये आतापर्यंत ४० टक्के कर्मचाऱ्यांचे व्हॅक्सिनेशन झाले आहे. ४५ वर्षांवरील ८०० जणांनी लस घेतली आहे.
...
कोट
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना शासनाने लसीकरणामध्ये प्राधान्यक्रम दिलेला नाही. मात्र आम्ही आमच्यास्तरावर मनपा आयुक्तांसोबत पत्रव्यवहार करून महामंडळातील कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्याची विनंती केली आहे. या विनंतीला त्यांनी सकारात्मकपणे प्रतिसाद दिला आहे.
- नीलेश बेलसरे, विभागीय वाहतूक नियंत्रक, नागपूर
...
संपूर्ण लॉकाडाऊन काळातही सेवा
शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ या काळात शासनाने संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले आहे. हे दोन दिवस खासगी प्रवासी वाहतुकीला प्रवासी सेवेची परवानगी नाही. मात्र एसटी महामंडळाच्या बसेस या काळातही चालविल्या जाणार आहेत. तथापि, या काळात प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन फेऱ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे, मात्र सेवा कायम राहणार आहे.
...