पुरेसा पुरवठा नसल्याने लसीकरण थंडावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:08 AM2021-04-15T04:08:33+5:302021-04-15T04:08:33+5:30
नागपुरात लस महोत्सवाचा उत्साह दिसला नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारच्या आवाहनानुसार देशभरात ११ एप्रिलला लस महोत्सव ...
नागपुरात लस महोत्सवाचा उत्साह दिसला नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारच्या आवाहनानुसार देशभरात ११ एप्रिलला लस महोत्सव सुरू झाला. परंतु नागपुरात लस महोत्सवाच्या ११ ते १४ एप्रिल या कालावधीत लसीकरण मोहीम थंडावली. आधी दररोज १५ ते १६ हजार लाभार्थींना लस दिली जात होती. मागील चार दिवसात ही संख्या ६ ते ७ हजारावर आली. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसाच्या प्रतीक्षेनंतर नागपूर शहराला कोविशिल्डचे ४० हजार डोस उपलब्ध करण्यात आले. हे डोस तीन ते चार दिवस पुरतील. यामुळे लसीकरण मोहिमेवर परिणाम झाला आहे.
दुसरीकडे कोव्हॅक्सिन केंद्र पूर्णपणे बंद पडले आहेत. मेडिकल रुग्णालयात जे डोस होते, ते संपल्याची माहिती आहे. यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांना भटकंती करावी लागणार आहे. लसीकरणाला गती देऊन कोरोना संक्रमणाला आळा घातला जाईल, असे केंद्र सरकारकडून सांगितले जात आहे. परंतु मागणीनुसार पुरवठा नसल्याने याचा परिणाम लसीकरणावर झाला आहे.
लससाठ्यासंदर्भात आरोग्य विभाग, मनपा प्रशासन बोलायला तयार नाही. मनपाचे आरोग्य अधिकारी फोनवर प्रतिसाद देत नाही. लसीची मागणी केली आहे. लवकरच केंद्र सरकारकडून ती उपलब्ध होईल, असे सांगितले जात आहे.
...
शहरातील लसीकरण
दिनांक लसीकरण
१० एप्रिल १६,४५१
११ एप्रिल ६,६६६
१२ एप्रिल ९,३८०
१३ एप्रिल ६,७६३
१४ एप्रिल ७,८२९
.....
ग्रामीण भागातही मोहीम संथ
नागपूर ग्रामीण भागातही बुधवारी फक्त ६,००१ डोस देण्यात आले. मागील तीन ते चार दिवसात लसीकरण ३० ते ४० टक्के घटले आहे. आधी शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात लसीकरणाने वेग पकडला होता. आता दुसऱ्या डोससाठी भटकंती करावी लागत आहे.