विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:10 AM2021-02-26T04:10:54+5:302021-02-26T04:10:54+5:30
नागपूर : विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी कोविड ...
नागपूर : विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली. कोविड लस घेतल्यानंतर तिचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. ही लस पूर्णत: सुरक्षित असल्यामुळे कोविड योद्ध्यांनी न घाबरता, कोणतीही भीती न ठेवता ती घ्यावी, असे आवाहनही केले. गुरुवारी नागपूर जिल्ह्यात ८४.४ टक्के लसीकरण झाले.
नागपूर जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी वाढली आहे. गुरुवारी नागपूर ग्रामीणमधील १५ केंद्रांना प्रत्येकी १०० प्रमाणे १५०० लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी १०८० लाभार्थ्यांनी लस घेतली. यात ३५४ लाभार्थ्यांनी पहिला, तर ७२६ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला. शहरात २० केंद्रांवर प्रत्येकी १०० प्रमाणे २००० लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी १८५३ लाभार्थ्यांनी लस घेतली. यात १२०९ लाभार्थ्यांनी पहिला डोस, तर ६४४ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला. लसीकरणाचे एकूण प्रमाण गुरुवारी ९२.६५ टक्क्यांवर गेले. दोन दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी, तर गुरुवारी जिल्हाधिकारी ठाकरे व डॉ. जयस्वाल यांनी लस घेतली. यावेळी अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, पीएसएम विभागाचे प्रमुख डॉ. उदय नारलावार, आदी उपस्थित होते.
-कोव्हिशिल्ड नको असल्यास कोव्हॅक्सिन लस
‘को-विन’अॅपमध्ये नाव असलेल्या लाभार्थ्यांना पहिल्या डोससाठी कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन दोन पैकी कोणतीही लस घेता येऊ शकते. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढताच सीरम इन्स्टिट्यूटची ‘कोव्हिशिल्ड’ व भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’लसीला प्रतिसाद वाढला आहे.