१२ ते १५ वयोगटाचे लसीकरण लवकरच! नागपुरातील मेडिकलमध्ये मानवी चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 07:45 AM2022-02-08T07:45:00+5:302022-02-08T07:45:02+5:30

Nagpur News ‘कोरबेव्हॅक्स’ लसीची मानवी चाचणी नागपूर मेडिकलसह देशात दहा ठिकाणी झाली. ५ ते १८ वयोगटात झालेल्या या चाचणीमुळे लवकरच १२ ते १५ वयोगटात लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Vaccination for 12 to 15 year olds soon! Human testing at Nagpur Medical College | १२ ते १५ वयोगटाचे लसीकरण लवकरच! नागपुरातील मेडिकलमध्ये मानवी चाचणी

१२ ते १५ वयोगटाचे लसीकरण लवकरच! नागपुरातील मेडिकलमध्ये मानवी चाचणी

googlenewsNext
ठळक मुद्देकेंद्र सरकारने दिली कोेरबेव्हॅक्स लसीची ऑर्डर

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाविरुद्धच्या लसीकरणात ३ जानेवारीपासून सुरू झालेल्या १५ ते १८ वयोगटांतील लसीकरणामुळे आणखी गती आली आहे. यातच आता केंद्र सरकारने ‘बॉयलॉजिकल ई’ कंपनीची ‘कोरबेव्हॅक्स’ लसीचे ५ कोटींचे डोस विकत घेण्यासाठी संबंधित कंपनीला ऑर्डर दिली आहे. ‘कोरबेव्हॅक्स’ लसीची मानवी चाचणी नागपूर मेडिकलसह देशात दहा ठिकाणी झाली. ५ ते १८ वयोगटात झालेल्या या चाचणीमुळे लवकरच १२ ते १५ वयोगटात लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहिमेत कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन व स्पुतनिक ही लस दिली जात आहे. यातील ‘कोव्हॅक्सिन’ व ‘झायडस’सोबतच ‘बॉयलॉजिकल ई’ कंपनीची ‘कोरबेव्हॅक्स’ ही भारतात तयार होणारी तिसरी लस आहे. या लसीची पहिली आणि दुसरी मानवी चाचणी १८ वर्षांवरील स्वयंसेवकांवर यशस्वी झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात पुणे व नागपूर मेडिकलमध्ये चाचणी झाली. इंजेक्शनच्या स्वरुपात दिली जाणाऱ्या या लसीच्या चाचणीच्या निष्कर्षानंतरच केंद्र सरकारने ‘कोरबेव्हॅक्स’ लसीचे ५ कोटींचे डोस विकत घेण्याची ऑर्डर दिली आहे. संबंधित कंपनीने हे डोस फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत उपलब्ध करून देण्याची हमी दिली आहे. यामुळे मार्च महिन्यापासून १२ ते १५ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता वाढली आहे.

अशी झाली मानवी चाचणी

‘कोरबेव्हॅक्स’ लसीची मानवी चाचणी ५ ते १२ व १३ ते १८ या दोन वयोगटात घेण्यात आली. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस २८ दिवसांनंतर देण्यात आला. दोन्ही डोस ‘०.५ एमएल’चे होते. तिसरा डोस म्हणजे ‘बूस्टर’ डोसची चाचणी अद्यापही सुरू आहे. दुसऱ्या डोसच्या ४२ दिवसांनंतर तिसरा डोस दिला जात आहे.

नागपुरात चाचणीसाठी फार कमी मुले मिळाली

मेडिकलच्या ‘रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र विभागा’चे (पीएसएम) प्रमुख डॉ. उदय नारलावार यांच्या मार्गदर्शनात ‘कोरबेव्हॅक्स’ लसीची ५ ते १८ वयोगटातील मुलांवर मानवी चाचणी घेण्यात आली. डॉ. नारलावार यांनी ‘लोकमत’ला सांगितले, या मानवी चाचणीसाठी जी मुले समोर आलीत त्यांच्यातील अनेकांमध्ये ॲण्टिबॉडीज निर्माण झाल्याचे आढळून आले होते. यामुळे फार कमी मुले चाचणीसाठी मिळाली. त्यांचा अहवाल कंपनीला पाठविला आहे.

३ मार्चनंतर होऊ शकते लसीकरण सुरू!

२ ते १८ वयोगटात कोव्हॅक्सिन लसीची नागपुरात घेण्यात आलेल्या मानवी चाचणीचे संयोजक व बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांनी सांगितले, १५ ते १८ वयोगटात कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. आतापर्यंत जवळपास ८० टक्के किशोरवयीन मुलांना ही लस देण्यात आली. २० टक्के मुले शिल्लक आहे. ते संपल्यावर साधारण ३ मार्चपासून १२ ते १५ या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Web Title: Vaccination for 12 to 15 year olds soon! Human testing at Nagpur Medical College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.