आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण १६ जानेवारीपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:16 AM2021-01-13T04:16:17+5:302021-01-13T04:16:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहर व जिल्हा ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याची प्रक्रिया ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहर व जिल्हा ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याची प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जवळपास १२ हजारांवर आरोग्य कर्मचाऱ्यांची यासंदर्भात नोंद झाली असून १५ ठिकाणी या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या संदर्भातील आढावा बैठक जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली.
जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपक थेटे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्ह्यातील शासकीय व खासगी आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १६ तारखेच्या लसीकरणाचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट केले. यामध्ये एका सत्रात १०० कर्मचाऱ्यांना लसीकरण होणार असून जवळपास १२ हजार कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. कोविड पोर्टलवर सध्या ११ हजार ६४५ कर्मचाऱ्यांची नोंद झाली आहे, या कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. त्यामुळे लसीकरणाच्या जागांची निश्चिती, लस देणारे व घेणारे यांची संपूर्ण व्यवस्था, लसीकरणासाठी साहाय्यभूत उपाययोजना, लसीकरण काळातील स्थिती, शीतीकरण प्रक्रियेत इलेक्ट्रिसिटीचा योग्य व सुरक्षित वापर, कोरोना लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची नोंद घेणे व स्वॅब घेण्याची आवश्यकता, या लसीकरण मोहिमेनंतर राबविण्यात येणारी सामान्य नागरिकांसाठीची लसीकरण योजनेची तयारी, यासंदर्भातही आज चर्चा करण्यात आली.
१५ ठिकाणी होणार लसीकरण
जिल्ह्यात सर्व दहा ग्रामीण रुग्णालये, दोन उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र बोरखेडी, गोंडखैरी व सावनेर येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र असे एकूण १५ ठिकाणी हे लसीकरण होणार आहे. याशिवाय महापालिकेमार्फत नागपूर शहराकरिता स्वतंत्ररीत्या १६ जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ही मोहीम राबविली जाणार आहे.