ताडाेबात पर्यटनासाठी दाेन्ही डाेस बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 07:00 AM2022-01-06T07:00:00+5:302022-01-06T07:00:07+5:30
Nagpur News काेराेनाचा वाढता प्रकाेप लक्षात घेता नवे दिशानिर्देश जारी करण्यात आले असून लसीचे दाेन्ही डाेस घेतलेल्यांनाच ताडाेबाच्या काेर आणि बफर झाेनमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
संजय रानडे
नागपूर : ताडाेबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (टीएटीआर) मध्ये व्याघ्रदर्शन करणे आता लसीकरणाशिवाय अशक्य ठरणार आहे. पुन्हा काेराेनाचा वाढता प्रकाेप लक्षात घेता नवे दिशानिर्देश जारी करण्यात आले असून लसीचे दाेन्ही डाेस घेतलेल्यांनाच ताडाेबाच्या काेर आणि बफर झाेनमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
बुधवारी हे दिशानिर्देश जारी करण्यात आले असून या आठवड्यानंतर ते लागू हाेणार आहेत. दरम्यान, पार्कमध्ये ७ जानेवारीपासून नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. यानुसार रायडर्सना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहेत. चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसारच पुढचे बदल हाेतील. लाेकमतशी बाेलताना ताडाेबाचे क्षेत्र संचालक डाॅ. जितेंद्र रामगावकार यांनी सांगितले, ताडाेबामध्ये १ ऑक्टाेबर २०२१ पासून काेराेना प्रतिबंधक दिशानिर्देशानुसार पर्यटनाला सुरुवात करण्यात आली हाेती. मात्र आता पुन्हा रुग्णांची संख्या वाढत असल्याने पूर्वनियाेजन करण्यात येत आहे. नव्या निर्णयानुसार पर्यटनासाठी येणाऱ्यांना पूर्ण लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. हे नियम पर्यटकांसह गाईड, जिप्सीचालक व निसर्गवाद्यांना लागू असतील. गेट व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनाही लसीकरण बंधनकारक असेल.
एकाच कुटुंबातील सदस्य असल्यास ६ लाेकांना एकाचवेळी पर्यटन करता येईल. मात्र कुटुंबातील नसलेले केवळ ४ पर्यटक सफारीचा आनंद घेऊ शकतील. भेट देणाऱ्यांना मास्क वापरण्यासह वेगवेगळ्या नियमांचे पालन करावे लागेल. मास्क न वापरणाऱ्यांना १००० रुपये दंड आकारण्यात येईल, असा इशाराही डाॅ. रामगावकर यांनी दिला.
पूर्ण लसीकरण झालेले म्हणजे काेण?
ज्यांनी लसीचे दाेन्ही डाेस घेतले असतील आणि दुसरा डाेस कमीत कमी १४ दिवसांच्या अगाेदर घेतला असेल. वैद्यकीय कारणाने ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी डाॅक्टरांकडून तसे आराेग्य प्रमाणपत्र सादर करण्याची गरज आहे. १५ वर्षाखालील मुलांनाही या गटात समाविष्ट करण्यात येईल.
पेंच, उमरेड कऱ्हांडलाबाबत निर्णय नाही
दरम्यान, पेंच व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, बाेर व्याघ्र प्रकल्प, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य यांच्यातर्फे अद्याप काेणतेही दिशानिर्देश जारी करण्यात आलेले नाहीत. क्षेत्र संचालक एम. रामानुजम यांनी सांगितले की याबाबत आदेश आल्यानंतर गरजेनुसार निर्णय घेण्यात येईल.