मनपा केंद्रावरील लसीकरण आज बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:08 AM2021-06-25T04:08:10+5:302021-06-25T04:08:10+5:30
तीन शासकीय केंद्र सुरू राहणार: नागपुरात दोन दिवसात ४२,२५६ जणांना डोस लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारने आखलेल्या ...
तीन शासकीय केंद्र सुरू राहणार: नागपुरात दोन दिवसात ४२,२५६ जणांना डोस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारने आखलेल्या नव्या धोरणानुसार व राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर जिल्ह्यात १८ वर्षावरील लसीकरणाला उत्साहात सुरुवात झाली. नागपूर शहरात बुधवारी २३ हजार ७०३ तर गुरुवारी २० हजार ३५ असे दोन दिवसात ४२ हजार २५६ जणांना डोस देण्यात आला. लसीकरणाचा आजवरचा हा विक्रम होता. मात्र शासनाकडून महापालिकेला कोव्हिशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रावर शुक्रवारी सर्व वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद राहणार आहे.
मनपाकडे बुधवारी ४५ हजार डोस उपलब्ध होते. ते ४२,२५६ जणांना दोन दिवसात देण्यात आले. शासनाकडून गुरुवारी नवीन डोस उपलब्ध झाले नाही. यामुळे शुक्रवारी लसीकरण होणार नसल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. शुक्रवारी १८ वर्षावरील सर्व वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लस फक्त तीन शासकीय केंद्रावर उपलब्ध राहील. यात - डागा रुग्णालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो रुग्णालय) व एम्सचा समावेश आहे.. यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
....
४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन उपलब
४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन लस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज),डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय व स्व.प्रभाकर दटके रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे. तसेच ज्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज) व स्व.प्रभाकर दटके रोग निदान केन्द्र येथे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी त्यांना ऑनलाईन नोंदणीचा पर्याय उपलब्ध आहे.