दहा दिवसात केवळ तीनच दिवस लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:08 AM2021-07-30T04:08:49+5:302021-07-30T04:08:49+5:30
नागपूर : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट सप्टेंबर महिन्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाने नुकतीच यावर बैठकही घेतली. परंतु ...
नागपूर : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट सप्टेंबर महिन्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाने नुकतीच यावर बैठकही घेतली. परंतु कोरोनाचा संकटाला दूर ठेवणाऱ्या लसीकरणाला फारसे गंभीरतेने घेतले जात नसल्याचे चित्र आहे. मागील दहा दिवसांत केवळ तीनच दिवच लसीकरण झाले. तीन दिवस लसीकरण बंद होते, तर उर्वरीत चार दिवस मर्यादित लसीकरण झाले.
कोरोनाचा तिसऱ्या लाटेला ‘डेल्टा प्लस’ विषाणू कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. हा विषाणू वेगाने फैलत असल्याने धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण हाच पर्याय आहे. २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण मोहिमही हाती घेण्यात आली. परंतु वारंवार पडणाऱ्या लसीच्या तुटवड्यामुळे या वयोगटाचे लसीकरण मंदावले आहे. महानगरपालिकेच्या माहितीनुसार, मागील दहा दिवसांपैकी २१, २२ व २५ जुलै रोजी लसीकरण झालेच नाही. २०, २४, २६ व २९ जुलै रोजी मर्यादित लसीकरण झाले तर, २३,२७ व २८ जुलै रोजी पूर्ण क्षमतेने लसीकरण झाले. मर्यादित लसीकरणात केवळ ४५ वर्षांवरील वयोगटासाठीच लसीकरणाची सोय असल्याने तब्बल सात दिवस १८ ते ४४ वयोगट लसीकरणपासून दूर होते.
-८६ हजार लोकांनी घेतला पहिला डोस
२० ते २९ जुलै या दरम्यान ८६ हजार २८९ लोकांनी पहिला डोस घेतला. यात १८ ते ४४ वयोगटात लस घेणाऱ्यांची संख्या ६५ हजार २७६ होती. याच कालावधीत ४४ हजार ९१९ लोकांनी दुसरा डोस घेतला. यात १८ ते ४४ वयोगटातील तरुणांची संख्या ६ हजार ८९६ होती. आतापर्यंत एकूण ९ लाख २९ हजार २०३ लोकांनी पहिला तर, ३ लाख ७७ हजार ७०१ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.