संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी व्हॅक्सिनेशन हाच पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:08 AM2021-03-28T04:08:28+5:302021-03-28T04:08:28+5:30
नागपूर : कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांना हुडकून काढणे, त्याला क्वारंटाईन करणे, चार ...
नागपूर : कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांना हुडकून काढणे, त्याला क्वारंटाईन करणे, चार ते पाच दिवसांनी चाचणी करणे व पॉझिटिव्ह आल्यास उपचाराखाली आणणे आवश्यक ठरते. परंतु शहरात कागदावरच ‘ट्रेसिंग’ होत असल्याने पुढील प्रक्रिया समोर जातच नाही. परिणामी, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे सर्वांचेच तातडीने लसीकरण (व्हॅक्सिनेशन) हाच एक पर्याय राहिल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण व मृत्यूसंख्येचे भयावह आकडे समोर येत आहेत. एक ाघराआड रुग्ण आढळून येत असल्याने फैलाव राखणे कठीण होत चालल्याचे चित्र आहे. पहिल्या कोरोनाच्या लाटेपासून कोणीच धडे घेतले नसल्याने ही भयानक स्थिती निर्माण झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्यानुसार, कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या दररोज २५ हजार संशयित रुग्णांचे ‘ट्रेसिंग’ केले जाते. यासाठी १५१ पथके आहेत. प्रत्येक पथकात दोन कर्मचारी आहेत. परंतु पथक घरी येत नसल्याचे किंवा साधी चौकशीही करीत नसल्याच्या अनेक रुग्णांच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे, एका बाधित रुग्णांच्या संपर्कात १० ते १५ लोक येतात. परंतु आपल्याकडे केवळ ५ ते ६ लोकांचेच ट्रेसिंग होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. यामुळे शासनाला या पलीकडचा विचार करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-सर्वांचेच तातडीने लसीकरण आवश्यक-डॉ. जय देशमुख ()
वरिष्ठ फिजिशियन डॉ. जय देशमुख म्हणाले, आपण कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून कुठलेही धडे घेतलेले नाहीत. यामुळे ही बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे व शारीरिक अंतर पाळणे हे आता मागे पडले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी ‘लसीकरण’हाच एकमेव पर्याय आहे. नागपुरात वाढती रुग्णसंख्या पाहता सर्वांचेच तातडीने लसीकरण हे ‘मॉडेल’ म्हणून हाती घ्यायला हवे. ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले त्यांनाच सार्वजनिक ठिकाणी प्रवेशास परवानगी द्यावी. यात यश मिळाल्यास संपूर्ण भारतात हे ‘मॉडेल’ म्हणून राबवायला हवे. केवळ ५०० रुपयांच्या लसीकरणाअभावी रुग्णांचे जीव जात आहे, घर उद्ध्वस्त आहे. हे थांबायला हवे.
-तरुणांचे लसीकरण गरजेचे-डॉ. अश्विनी तायडे ()
संसर्गजन्य आजार विशेषज्ञ डॉ. अश्विनी तायडे म्हणाल्या, लॉकडाऊन असो किंवा नसो, तरुण वर्ग रस्त्यावर व गर्दीच्या ठिकाणी दिसतोच. त्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहत असल्याने अनेकदा ते पॉझिटिव्ह असूनही लक्षणे दिसून येत नाहीत. परंतु त्यांच्याकडून घरातील अनेक सदस्यांना लागण होते. विशेषत: ५० वर्षांवरील सदस्यांना मृत्यूचा धोका निर्माण होतो. हे थांबविण्यासाठी तातडीने तरुणांचे लसीकरण गरजेचे झाले आहे. कोरोनावर प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे.
-लसीकरण अधिक व्यापक करणे गरजेचे-डॉ. प्रशांत पाटील ()
मेडिकलच्या औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील म्हणाले, ज्या झपाट्याने रुग्ण वाढत आहेत त्या तुलनेत वैद्यकीय सोयी अपुऱ्या पडण्याची दाट शक्यता आहे. कोरोना प्रतिबंधासाठी आपल्याकडे लसीकरण हाच पर्याय आहे. यामुळे लसीकरण अधिक व्यापक करणे व तातडीने करणे गरजेचे आहे. ज्यांचे लसीकरण होईल त्यांनाच सार्वजनिक ठिकाणी प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यास याचा फायदा दिसून येईल.
-वस्त्यांमधील नर्सिंग होममध्ये कोविड रुग्णांवर उपचार व्हावा-डॉ. सुशांत मेश्राम ()
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम म्हणाले, कोरोनावर लसीकरण हाच पर्याय आहे. त्याची गती नक्कीच वाढवायला हवी. परंतु सध्याच्या स्थितीत रुग्णांना गंभीर होण्यापासून व त्यांचा जीव वाचविण्यासाठी वस्त्या-वस्त्यांमधील पाच ते दहा खाटांच्या नर्सिंग होममध्येसुद्धा कोरोनाबाधितांवर उपचार होणे अधिक गरजेचे आहे. नर्सिंग होममधील गंभीर रुग्णांवरील उपचारासाठी प्रत्येक मनपाच्या झोननिहाय १० ते १५ डॉक्टरांचे पॅनल तयार करायला हवे. ते फोनद्वारे उपचाराची माहिती देऊ शकतील. यामुळे अनेक रुग्णांचे जीव वाचविणे शक्य होईल.