दोन दिवसातच निघाली लसीकरणाची हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:08 AM2021-05-08T04:08:44+5:302021-05-08T04:08:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लस महोत्सवापासून नागपूर शहरात लसीकरणाची गती मंदावली आहे. नाममात्र लसीच्या भरवशावर काही दिवस लसीकरण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लस महोत्सवापासून नागपूर शहरात लसीकरणाची गती मंदावली आहे. नाममात्र लसीच्या भरवशावर काही दिवस लसीकरण झाले. गुरुवारी नागपूरला ६१ हजार लसीचे डोस मिळाले. त्यानंतर लसीकरणाला गती मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु तीही फोल ठरली. गुरुवारी ९६ केंद्रांवर केवळ ९८४ डोस उपलब्ध करण्यात आले होते. शुक्रवारी कसेबसे लसीकरण पार पडले. अनेक केंद्र बंद होती. शनिवारी ८ मे रोजी पुन्हा एकदा लसीच्या तुटवड्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण न करण्याचा निर्णय घेण्यात आला. लस उपलब्ध होताच पुन्हा लसीकरण सुरू केले जाईल. यासंदर्भात मनपाकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे.
मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कुठल्याही व्यक्तीला शनिवारी लस मिळणार नाही. साठा कमी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. साठा उपलब्ध होताच संबंधितांचे लसीकरण केले जाईल.
१८ वर्षांवरील नागरिकांसाठी ६ केंद्र
नागपूर शहरात १८ ते ४४ वर्षांवरील लाभार्थ्यांसाठी लसीकरणाची सुरुवात १ मेपासून सुरू झाली आहे. परंतु लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणालाा अद्याप मोठ्या प्रमाणावर करता आलेले नाही. आतापर्यंत केवळ ४,७४४ लाभार्थ्यांनाच ६ मेपर्यंत लस देण्यात आली आहे. १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लाभार्थ्यांसाठी शहरात केवळ ६ केंद्र आहेत. यात महाल येथील स्व. प्रभाकरराव दटके रोगनिदान केंद्र, सेंट्रल एव्हेन्यू येथील छापरू सर्वोदय मंडल हॉल आणि मानेवाडा नागरी प्राथिमक आरोग्य केंद्रात कोव्हॅक्सिन लावले जात आहे. तर पाचपावली प्रसूतीगृह रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर व आयसोलेशन रुग्णालय इमामवाडा येथे कोविशिल्ड लस लावली जात आहे. ऑनलाईन नोंदणी बंधनकारक आहे. नोंदणीसाठी जी वेळ देण्यात आली आहे त्याच वेळेत केंद्रावर पोहोचावे, असे मनपाने कळविले आहे.
बॉक्स
नागपुरात लसीकरण (६ मेपर्यंत )
पहिला डोस
आरोग्य कर्मचारी - ४३,७६१
फ्रंटलाईन वर्कर - ४८,२५३
१८ वर्षांवरील - ४,७४४
४५ वर्षांवरील - १,०५,४९७
४५ वर्षांवरील गंभीर आजार असणारे- ७६,५९६
६० वर्षांवरील सर्व नागरिक- १,८२,३०५
एकूण - ४,४१,१५६
दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी - २०,९३१
फ्रंटलाईन वर्कर - १३,६३१
४५ वर्षांवरील - १४,६१३
४५ वर्षांवरील गंभीर आजार असणारे- ११,४९४
६० वर्षांवरील सर्व नागरिक- ४९,८७५
एकूण - १,१०,५४४
आतापर्यंत एकूण लसीकरण - ५,५१,७००