विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:06 AM2021-06-04T04:06:57+5:302021-06-04T04:06:57+5:30
लोकमत न्यूज् नेटवर्क नागपूर : विदेशात शिक्षणासाठी जात असलेल्या १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला महापालिकेतर्फे गुरुवारी मनपाच्या इंदिरा ...
लोकमत न्यूज् नेटवर्क
नागपूर : विदेशात शिक्षणासाठी जात असलेल्या १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला महापालिकेतर्फे गुरुवारी मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयासमोरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे गर्ल्स होस्टेल, गांधीनगर आणि पाचपावली स्त्री रुग्णालय, पाचपावली येथे सुरुवात करण्यात आली. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर उपस्थित होते.
विदेशात शिक्षण घेण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. परंतु सध्या महाराष्ट्रात १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद आहे. याचा विचार करता मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी लसीकरण सुरू करण्याचे निर्देश दिले. नागपुरात २०० विद्यार्थांनी लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. इंदिरा गांधी रुग्णालय येथे पूर्वा मालवडे, परिणीता यादव, हर्षल जैस्वाल, संकेत डाहुले, दीक्षांत नंदनवार आणि अन्य विद्यार्थ्यांनी पहिली लस घेतली. नियमानुसार दोन लसच्या दरम्यान कमीतकमी ८४ दिवसाचा कालावधी असायला पाहिजे. पण विद्यार्थ्यांना लवकरात लवकर दुसरी लस मिळायला पाहिजे, यासाठी शासनासोबत पाठपुरावा सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले.