अन् पारधी बेड्यातही झाला लसीकरणाचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:07 AM2021-07-03T04:07:15+5:302021-07-03T04:07:15+5:30
भिवापूर : पारधी बेड्यात लसीकरणाचे प्रमाण एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत आहे. त्यामुळे तेथे लसीकरणाचा जागर महत्त्वाचा आहे. सरपंचांनी ही ...
भिवापूर : पारधी बेड्यात लसीकरणाचे प्रमाण एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत आहे. त्यामुळे तेथे लसीकरणाचा जागर महत्त्वाचा आहे. सरपंचांनी ही लोकहितवादी भूमिका ‘त्या’ पथकाला पारधी बेड्यात घेऊन गेली. पथनाट्य सुरू झाले अन् लागलीच आरडाओरड सुरू झाली. विद्यार्थी घाबरले. मात्र सरपंचांनी विश्वास दाखवित, पथनाट्य सुरू ठेवण्यास सांगितले. नंतर पारधी बेड्यातून त्याला प्रतिसादही मिळाला. मात्र ‘आम्ही लस घेणार नाही’ हा त्यांचा सूर कायम होता.
तहसीलदार अनिरुद्ध कांबळे व प्राचार्य डॉ. जोबी जॉर्ज यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तालुक्यातील गावागावात ‘टोचाल तर वाचाल’ या पथनाट्यातून लसीकरणाचा जागर करत आहेत. दरम्यान, २८ जून रोजी हे पथक पाहमी ग्रामपंचायतीत पोहोचले. तेथे पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. सरपंच विजय कारमोरे, ग्रामसेवक सुरेंद्र सवाईमुल, तलाठी पी. व्ही. दख्खनकर यांना ग्रामीण भाषेत पथनाट्यातून देण्यात आलेला मार्मिक संदेश भावला. त्यामुळे त्यांनी ‘गरडापार पारधी बेड्यातील वास्तव सांगत, अख्ख्या गावात केवळ तीन जणांनी लस घेतली. येथे जनजागृतीसाठी चला’ असा आग्रह धरला. कार्यक्रम अधिकारी डॉ. मोतीराज चव्हाण यांनी लागलीच होकार दिला. पथनाट्याचे पथक पारधी बेड्यात दाखल झाले. काहीतरी नवल होणार असल्याचे कुतूहल यावेळी पारधी बांधवांच्या चेहऱ्यावर होते. पथनाट्य सुरू झाले. मात्र लसीकरणाचे बॅनर दिसताच, बेड्यातील महिला भगिनींनी आरडाओरड सुरू केली. पथनाट्यही थांबले. मात्र सरपंच विजय कारमोरे यांनी पारधी बांधवांना त्यांच्याच भाषेत समज दिली. ‘लस घ्यायची की, नाही नंतर बघू आधी पथनाट्य बघा’ असे सांगत, विद्यार्थ्यांना पथनाट्य सुरू ठेवण्यास सांगितले. त्यानंतर पारधी बांधवांनी विविध दृश्यांवर हास्यकल्लोळ करत, पथनाट्य बघितले. यावेळी पाहमी व गरडापार शाळेतील शिक्षक सूरज येल्ले, प्रभाकर जळीत, छाया शामकुवर, सुनील कुंभारे, कमलशिंग राठोड हे सुद्धा उपस्थित होते.
‘गाव तसं चांगलं; पण दारूला टांगलं’
पारधी बांधवांचे गरडापार गाव राष्ट्रीय मार्ग क्र. एन.एच. ३५३ ई.ला अगदी लागून आहे. बेड्यातील पारधी बांधव समाजशील आहे. त्यामुळे हे गाव तसं चांगलं आहे; पण दारूला टांगलं आहे, असे म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. येथे शिक्षणाचे प्रमाण कमी असल्यामुळे कोविड चाचणी, निदान, उपचार, लसीकरण हे मुद्दे त्यांना पटण्यास आणि पटवून देण्यास प्रशासन फेल ठरते. शिक्षकांच्या आग्रहास्तव पारधी बेड्यातील मुले कशीबशी शाळेत जातात. त्यामुळे येथे दारूचा नव्हे तर शिक्षणाचा गंध दरवळणे महत्त्वाचे आहे.