कामगारांचे लसीकरण हाच कोरोनावर एकमेव उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:09 AM2021-09-03T04:09:34+5:302021-09-03T04:09:34+5:30
नागपूर : राज्य सरकारच्या आदेशानंतर व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णवेळ सुरू झाली आहेत. त्यासोबतच उद्योगांमध्ये निर्मित वस्तूंना मागणी वाढली आहे. उत्पादन ...
नागपूर : राज्य सरकारच्या आदेशानंतर व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णवेळ सुरू झाली आहेत. त्यासोबतच उद्योगांमध्ये निर्मित वस्तूंना मागणी वाढली आहे. उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू होताच कामगारांच्या जीवाची काळजी तेवढी महत्त्वाची ठरत आहे. कामगारांची काळजी घेताना उद्योजकांनीही कारखान्याच्या परिसरात विविध सोयी-सुविधा उभारल्या आहेत. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत आहे. सर्व कामगारांनी पहिले डोस घेतले आहेत. पण दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांची कालमर्यादा असल्याने अनेकांना दुसरा डोस मिळाला नाही. डोस न घेतलेला कामगार कोरोनाग्रस्त आढळल्यास कारखाना सील करण्याचे सूतोवाच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे सर्व उद्योजक अडचणीत सापडले आहेत. प्रशासनाने लसीकरणाची मोहीम सर्व औद्योगिक परिसरालगतच्या केंद्रात किंवा असोसिएशनच्या सभागृहात राबवावी, अशी प्रतिक्रिया विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.
विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित औद्योगिक परिसराजवळील केंद्रात कामगारांच्या लसीकरणाची सोय करण्याचे आश्वासन दिले आहे. शनिवारपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे बहुतांश कामगारांचा दुसरा डोस पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कामगारांच्या लसीकरणावर भर
जवळपास ७० टक्के कामगार ४५ वर्षांच्या आतील आहेत. सर्वांनी पहिला डोस घेतला आहे. पण वेळेच्या मर्यादेमुळे अनेकांनी दुसरा डोस घेतला नाही. पण प्रशासनाच्या पुढाकाराने कामगारांना दुसरा डोस मिळेल. उद्योजक कारखान्यात कोरोना नियमांचे पालन करीत आहेत.
प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन
नियमांचे पालन महत्त्वाचे
सरकारच्या नियमांचे पालन सर्वच युनिटमध्ये करण्यात येत आहे. कामगारांना दुसरा डोस देण्यासाठी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे. दोन दिवसांत लसीकरण सुरू होणार आहे. त्यामुळे कामगार व उद्योजकांना दिलासा मिळेल.
चंद्रशेखर शेगावकर, अध्यक्ष, एमआयए हिंगणा असोसिएशन
नियमांचे पालन करण्यावर भर
सर्वच कारखान्यांमध्ये कोरोना नियमांचे पालन करण्यावर भर दिला जातो. याशिवाय मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाते. याकरिता सर्वांनीच कारखान्याच्या परिसरात विविध उपकरणे लावली आहेत. कामगारांच्या काळजीसाठी सर्वच पुढाकार घेत आहेत.
अमर मोहिते, अध्यक्ष, कळमेश्वर इंडस्ट्रीज असोसिएशन
असोसिएशनतर्फे पुढाकार
विदर्भातील सर्वच कारखान्यांमध्ये कोरोना नियमांचे पालन आणि कामगारांच्या लसीकरणावर असोसिएशन भर देत आहे. सरकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका घेऊन कामगारांना दुसरा डोस देण्यासाठी पुढाकार घेत आहे. दुसऱ्या डोसनंतर उद्योजकांना दिलासा मिळेल.
सुरेश राठी, अध्यक्ष, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन