वडेट्टीवार पडळकरांवर ठोकणार ५० कोटींचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 09:51 PM2021-09-06T21:51:11+5:302021-09-06T21:51:39+5:30
Nagpur News राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील आरोप प्रत्यारोप आता आणखीनच तीव्र झाले आहेत. वडेट्टीवार यांनी त्यांच्याविरुद्ध ५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील आरोप प्रत्यारोप आता आणखीनच तीव्र झाले आहेत. पडळकर यांच्या आरोपामुळे दुखावलेले वडेट्टीवार यांनी त्यांच्याविरुद्ध ५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. तसेच पडळकर यांनी केलेले आरोप सिद्ध झाले तर राजकारणातून संन्यास घेईल, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला आहे. (Vadettiwar will file a claim of Rs 50 crore against Padalkars)
वडेट्टीवार यांचे दारूचे दुकान आहे, त्यामुळे चंद्रपुरात दारूबंदी हटविण्यात आली असल्याचा आरोप आ. पडळकर यांनी केला आहे. यासंदर्भात विचारले असता पडळकरांनी आरोप सिद्ध करून दाखविण्याचा इशाराच वडेट्टीवार यांनी दिला. वडेट्टीवार म्हणाले की, पडळकर हे पराभूत उमेदवार आहेत. भाजपने त्यांना विधान परिषदेत पाठवले आहे. आता ते भाजप नेत्यांना खुश करण्यासाठी तथ्यहीन आरोप लावत आहेत. कुणावर आरोप करून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याची सवय त्यांना लागली आहे. ते सध्या ओबीसी आंदोलनाला बदनाम करण्याच्या कामात गुंतले आहेत.