दादासाहेब फाळके महोत्सवात वैदर्भीय कलावंत चमकले; सांची जीवने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर नितीन काळबांडे उत्कृष्ट एडिटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 07:00 AM2021-05-03T07:00:00+5:302021-05-03T07:00:07+5:30
Nagpur News दिल्ली येथे पार पडलेल्या ११व्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात वैदर्भीय कलावंतांनी बाजी मारली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्ली येथे पार पडलेल्या ११व्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात वैदर्भीय कलावंतांनी बाजी मारली आहे.
भारतीय चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंतीप्रीत्यर्थ दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात नागपूरची नाट्य व सिने अभिनेत्री सांची जीवने हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘पैदागीर’ या मराठी चित्रपटातील प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी तिला हा पुरस्कार प्राप्त झाला. या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक संजय जीवने आहेत. यासोबतच विदर्भाच्या मातीतील कलावंतांची निर्मिती असलेल्या ‘स्वल्पविराम’ या माहितीपटाला डॉक्युमेंटरी विभागातील प्रोफेशनल कॅटेगिरीमध्ये बेस्ट एडिटिंगचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शक नितीन काळबांडे यांनी एडिटिंगची धुरा सांभाळली आहे. डॉक्युमेंटरी विभागात देश-विदेशातून एकूण ४८ माहितीपटांचा समावेश होता. त्यातून स्वल्पविरामची झालेली निवड हे विदर्भातील कलावंतांसाठी कौतुकास्पद आहे. हा माहितीपट नागपूरच्या गोवारी हत्याकांडावर भाष्य करतो. निर्माते मारुती मुरके यांच्या कथानकारवर ही डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली आहे.
..................