यूपीएससीत झळकला वैदर्भीय बाणा; सातजणांची यशस्वी झेप; नवा रेकॉर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 10:23 PM2023-05-23T22:23:00+5:302023-05-23T22:23:24+5:30
Nagpur News मंगळवारी जारी झालेल्या निकालात विदर्भातील तब्बल सात उमेदवारांनी यशस्वी झेप घेतली असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारांना यश मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेत पुन्हा एकदा वैदर्भीय बाणा झळकला आहे. मंगळवारी जारी झालेल्या निकालात विदर्भातील तब्बल सात उमेदवारांनी यशस्वी झेप घेतली असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारांना यश मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असलेले अमित उंदीरवाडे यांना अखिल भारतीय स्तरावर ५८१वी रँक मिळाली आहे. प्रतीक कोरडे यांना ६३८वी रँक मिळाली. ते नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. नागपूर शहरातील रहिवासी असलेले राहुल आत्राम यांना ६६३वी रँक मिळाली. तर, राजश्री देशमुख यांना प्रोव्हिजनल यशस्वी घोषित करण्यात आले. सध्या त्यांची रँक जाहीर झालेली नाही.
नागपुरातून नागरी सेवा परीक्षेत (प्रारंभिक) आठ हजारांहून अधिक उमेदवार सहभागी झाले होते. यापैकी ५८ उमेदवारांनी मुख्य परीक्षा दिली. नागपुरातील शासकीय नागरी सेवा परीक्षा पूर्वतयारी केंद्रातील १४ उमेदवारांनी मुख्य परीक्षा दिली होती. मुख्य परीक्षा देणारे ५८ पैकी २२ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. यापैकी सातजणांची निवड झाली. या परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढू शकते. कारण, बरेच उमेदवार परीक्षा व मुलाखतीच्या तयारीसाठी दिल्लीसह विविध शहरात जातात. त्यामुळे त्यांचे निकाल कळू शकत नाही.
अंबानगरीतील लेकीचे दुसऱ्यांदा यूपीएससीत यश
अमरावती : यूपीएससीच्या परीक्षेत अंबानगरीतील लेकीने सात वर्षांनंतर पुन्हा एकदा यश संपादन केले आहे. केवल कॉलनीत राहणाऱ्या वैशाली धांडे हिने यूपीएससी परीक्षेमध्ये ९०८ वी रँक प्राप्त केली असून, पुन्हा एकदा तिला आयआरएस कॅडरच मिळाले आहे. परंतु वैशाली ही आधीच नागपूर येथील जीएसटी कार्यालयात आयआरएसपदी कार्यरत आहे.
वैशालीने दुसऱ्यांदा या परीक्षेमध्ये यश संपादन केले. वैशालीने यापूर्वी यूपीएससी-२०१६ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात यश संपादन केले होते. यावेळी तिला ९६४ वी रॅँक मिळाल्याने आयआरएस कॅडर मिळाले होते. यूपीएससी तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी हा आयएसएस होण्याचे स्वप्न मनामध्ये बाळगतो. हेच स्वप्न वैशालीचेहीदेखील होते. त्यामुळे तिने पुन्हा एकदा यूपीएससी-२०२२ ची परीक्षा दिली. या परीक्षेतही तिला यश मिळाले; परंतु तिला ९०८वी रॅँक मिळाली असून, पुन्हा एकदा तिला आयआरएस कॅडरच मिळाले आहे. सध्या वैशाली नागपूर येथील जीएसटी ऑडिट कार्यालयात कार्यरत आहे. त्यामुळे आयएसएससाठी तिसरा प्रयत्न करणार आहे का, असे तिला विचारले असता, यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे तिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.