स्मरणशक्तीमध्ये वैष्णवी पोटेचा राष्ट्रीय विक्रम
By admin | Published: June 27, 2017 02:04 AM2017-06-27T02:04:55+5:302017-06-27T02:04:55+5:30
संत्रानगरीतील वैष्णवी पोटेने सोमवारी स्मरणशक्तीमध्ये राष्ट्रीय विक्रम केला. तिने १०० वस्तूंची नावे सरळ क्रमाने, उलट क्रमाने व मिश्र क्रमाने अचूकपणे सांगितली.
विविध क्रमाने सांगितली १०० वस्तूंची नावे : इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्मध्ये होणार नावाची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संत्रानगरीतील वैष्णवी पोटेने सोमवारी स्मरणशक्तीमध्ये राष्ट्रीय विक्रम केला. तिने १०० वस्तूंची नावे सरळ क्रमाने, उलट क्रमाने व मिश्र क्रमाने अचूकपणे सांगितली. तिच्या या विक्रमामुळे संत्रानगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. संत्रानगरीचे नाव राष्ट्रीयस्तरावर पोहोचले. इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्च्या २०१८ मधील आवृत्तीमध्ये या विक्रमाचा समावेश केला जाणार आहे.
राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष कार्य अधिकारी मनोहर पोटे यांची वैष्णवी कन्या होय. भवन्स शाळेमध्ये इयत्ता बारावीला असलेल्या वैष्णवीचा जन्म २३ जानेवारी २००१ रोजी झाला. ती लहानपणापासूनच चाणाक्ष बुद्धीची आहे. कोणत्याही गोष्टी तिला चटकन लक्षात राहतात.
वैशाली कोडे यांच्या मुलीने राज्यघटनेतील आर्टिकल तोंडपाठ सांगण्याचा विक्रम केला. वैशाली कोडे यांनी पोटे कु टुंबाला वैष्णवीने राष्ट्रीय विक्रम करावा, यासाठी प्रोत्साहन दिले. तेथून वैष्णवीच्या विक्रमाची तयारी सुरू झाली.
असा झाला विक्रम
सिव्हिल लाईन्सस्थित चिटणवीस सेंटर येथे वैष्णवीची परीक्षा घेण्यात आली. इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्चे पंच डॉ. मनोज तत्वादी यांनी विक्रमाचे परीक्षण केले. इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्ने पेन, मोबाईल, फॅन, बुक, बोर्ड इत्यादी १०० वस्तूंच्या नावाची यादी पाठविली होती. वैष्णवीला ही यादी स्क्रीनवर १० मिनिटांसाठी दाखविण्यात आली. या वेळात वैष्णवीने सर्व वस्तूंची नावे स्मरणात घेतली. त्यानंतर ती प्रेक्षकांकडे पलटली. त्यावेळी स्क्रीनवरील नावे केवळ प्रेक्षकांना दिसत होती. स्क्रीन वैष्णवीच्या मागे होती. तिने सुरुवातीला नियमित क्रमाने व त्यानंतर उलट क्रमाने अचूकपणे वस्तूंची नावे सांगितली. त्यानंतर पंचाने तिला मिश्र क्रमाने वस्तूंची नावे विचारली. वैष्णवीने त्यांना योग्य उत्तरे देऊन विक्रम केला.