वाजपेयींनी गाजवली नागपूरची प्रचारसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 09:12 PM2018-08-16T21:12:17+5:302018-08-16T21:14:32+5:30

अटलबिहारी वाजपयी हे उत्कृष्ट वक्ते होतेच. त्यांनी अनेक प्रचारसभा गाजवल्या. नागपूरच्या कस्तूरचंद पार्कवरही त्यांच्या ऐतिहासिक सभा पार पडल्या. परंतु २००४ मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांची कस्तूरचंद पार्कवर झलेली प्रचार सभा ही विशेष होती. कारण पंतप्रधान म्हणून त्यांनी या प्रचारसभेला संबोधित केले होते. या सभेत त्यांनी नेहमीप्रमाणे काँग्रेसवर प्रहार केलेच. परंतु भारत कुणासमोरही झुकणार नाही असा दम थेट अमेरिकेसह संपूर्ण जगालाही नागपुरातूनच दिला होता.

Vajpayee wielded Nagpur campaign rally | वाजपेयींनी गाजवली नागपूरची प्रचारसभा

वाजपेयींनी गाजवली नागपूरची प्रचारसभा

Next
ठळक मुद्देअमेरिकेसह जगालाही दिला होता दम : भाषणादरम्यान अनेकदा साधला मराठीत संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अटलबिहारी वाजपयी हे उत्कृष्ट वक्ते होतेच. त्यांनी अनेक प्रचारसभा गाजवल्या. नागपूरच्या कस्तूरचंद पार्कवरही त्यांच्या ऐतिहासिक सभा पार पडल्या. परंतु २००४ मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांची कस्तूरचंद पार्कवर झलेली प्रचार सभा ही विशेष होती. कारण पंतप्रधान म्हणून त्यांनी या प्रचारसभेला संबोधित केले होते. या सभेत त्यांनी नेहमीप्रमाणे काँग्रेसवर प्रहार केलेच. परंतु भारत कुणासमोरही झुकणार नाही असा दम थेट अमेरिकेसह संपूर्ण जगालाही नागपुरातूनच दिला होता.
२००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत नागपूर-कामठी लोकसभा मतदार संघातून भाजपने अटलबहादूर सिंग यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. तेव्हा केंद्रात भाजपाचे सरकार होते. अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. अटलबहादूर सिंग यांच्या प्रचारासाठी अटलबिहारी वाजपेयी तेव्हा नागपूरला आले होते. १६ एप्रिल २००४ रोजी कस्तूरचंद पार्कवर त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक अशी ठरली. या सभेत त्यांनी काँग्रेसवर प्रहार केले. भाजपाने केलेल्या कामांचे वर्णन करीत चांगल्याला चांगले म्हणण्याची हिंमत ही आजच्या काँग्रेसमध्ये नाही. काँग्रेस अमेरिकेच्या दबावापुढे झुकली, परंतु आम्ही संधी मिळताच अणूस्फोट घडविला, असे सांगत आपण अमेरिकेपुढे झुकणार नाही, असे स्पष्ट केले.
वाजपेयी यांनी भाषणामध्ये मधूनमधून मराठी शब्दांचा वापर केला. त्यांनी भाषणाची सुरुवातच ‘नागपूर आणि महाराष्ट्रातील सर्व बंधू-भगिनींना मनापासून नमस्कार’ अशी केली. गंगेवरील कवितेसोबत आपण नेहरूंची प्रशंसा केली तर आपल्याला नेहरूवादी म्हणतात, कोण आहे नेहरूवादी? बोडखं तुमचं’ असे वाजपेयी म्हणताच हास्याची कारंजी उडाली. आपल्या सरकारमधील काही लोक गडबड करायचे, असे सांगून वाजपेयी म्हणाले होते, की त्यांना मी तुम्ही जास्त गडबड करू नका असे मराठीत संगितले की, ते ऐकत असत.
भाषण संपवून जागेवर बसण्यापूर्वी वाजपेयी यांनी नागपूरचे उमेदवार अटलबहादूर सिंग यांना हात धरून समोर आणले आणि म्हणाले ‘मी समजत होतो केवळ अटल असणेच पुरेसे असते. पण येथे अटल बहादूर झाले आणि वरून सिंग ही’ वाजपेयींच्या या वाक्यावर साºयांनीच हसून दाद दिली.

‘इंग्रजांना माफीनाफा’बाबत खुलासा अन् खंत
अटल बिहारी वाजपेयी यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत पकडले गेले असता इंग्रजांना माफीनामा लिहून त्यांनी स्वत:ची सुटका करून घेतली होती. म्हणून ते दशभक्त नसून देशद्रोही आहेत, असा आरोप नेहमी केला जातो. त्या काळातही हा आरोप केला गेला. त्यासंदर्भात वाजपेयी यांनी नागपूरच्याच जाहीर सभेत त्याचे उत्तर दिले होते. त्यांनी सांगितले की, ‘शालेय जीवनात आपण स्वातंत्र्याच्या लढाईत सहभागी झालो होता. पण खोल्या जाळल्याचा आरोप करून आम्हा दोन भावांना अटक करण्यात आली. त्यात आम्ही नव्हतो. हे सिद्ध झाल्यावर पोलिसांनी आम्हाला सोडले,’ असा खुलासा वाजपेयी यांनी तेव्हा केला होता. आम्ही निवडणूक जिंकण्याच्या मार्गावर आज आहोत. म्हणून मुद्दाम हा मुद्दा उचलला जात आहे. देशभक्त असल्याचे सिद्ध करावे लागत असेल तर देशात राहण्याचा कुठलाही आनंद नाही. माझ्या मनाला अशा आरोपांमुळे वेदना होतात. इच्छा होते की, निवडणूकच लढवू नये, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती. पण आपण मैदान सोडणार नाही, असेही ठणकावून सांगितले होते.

इंदिराजींना ‘दुर्गा’ म्हटले नसल्याचा खुलासा
अटलबिहारी वाजपेयी यांनीच इंदिरा गांधी यांना दुर्गा अशी उपमा दिल्याचे नेहमी सांगितले जाते. आपण त्यांना दुर्गा म्हटले नसल्याचा खुलासाही खुद्द वाजपेयी यांनी याच जाहीर सभेत केला होता. त्यांनी सांगितले की, ‘बांगलादेशाच्या युद्धात केलेल्या कामगिरीनंतर इंदिराजींची प्रशंसा केली होती, पण त्यांना दुर्गा म्हटले नव्हते. दुर्गेचे रूप, तिची भव्यता आणि दुर्गेच्या पूजेचा अर्थ आपल्याला चांगला माहिती आहे. इंदिराजींना दुर्गा म्हणणारे दुसरे होते, पण पेपरवाल्यांनी हे वाक्य आपल्या नावावर छापल्याचा’ खुलासा वाजपेयींनी केला.

 

Web Title: Vajpayee wielded Nagpur campaign rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.