शेतकऱ्यांनी बांधली वज्रमूठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:06 AM2020-12-09T04:06:27+5:302020-12-09T04:06:27+5:30
नागपूर : देशातील नवीन कृषी कायदा शेतकऱ्यांना संकटात टाकणारा आहे. यामुळे बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार आहे. त्यामुळे हा कायदा ...
नागपूर : देशातील नवीन कृषी कायदा शेतकऱ्यांना संकटात टाकणारा आहे. यामुळे बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार आहे. त्यामुळे हा कायदा रद्द होईपर्यंत शेतकऱ्यांचा लढा सुरू राहील, असा संकल्प करीत नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी केंद्र सरकार विरोधात वज्रमूठ बांधली. जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात भिवापूर ते नरखेड तालुक्यापर्यंत विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला बळ देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले. कामठी तालुक्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रदेश महासचिव सुरेश भोयर यांच्या उपस्थितीत केंद्र सरकार विरोधात निदेर्शने करण्यात आली. जिल्ह्यात उमरेड, बुटीबोरी, भिवापूर, रामटेक, नरखेड, कुही, मांढळ, वाडी, कोराडी या सर्वच प्रमुख शहरात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाविकास आघाडीचे समर्थक रस्त्यावर उतरले. सावनेर शहरात मुख्य रस्त्यावर टायर जाळत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. बंदमुळे जिल्ह्यातील कामठी, सावनेर, नरखेड आदी बाजार समित्यांचे व्यवहार दुुपारपर्यंत ठप्प राहिले.