आज ‘रोझ डे’ : तुम्ही दिलंय का कधी कुणाला गुलाबाचं फूल?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 12:25 PM2023-02-07T12:25:16+5:302023-02-07T12:31:02+5:30
प्रेमांकुराच्या बहाराला हवा समर्पणाचा भाव
नागपूर : जसे केशरी, हिरवा, निळा, लाल आदी रंगांना जाती-धर्मात विभागण्यात आले, अगदी तसेच स्वयंभू सौंदर्य घेऊन आलेल्या फुलांनाही भावनेच्या कल्लोळात विभागण्यात आले. पांढरे फूल शांतीचे, पिवळे फुल मैत्रीचे, काळे फुले निषेधाचे आदी. या मानवी भावनांच्या गदारोळात सहिष्णू निसर्गाला असहिष्णू बनविण्यात कुठलीही कसर सोडण्यात आलेली नाही.
प्रेम हे निसर्गाचे सर्वोदयी तत्त्व आणि फूल कोणतेही असो ते प्रत्येक भावनेच्या मुळाशी असलेल्या प्रेमाचेच प्रतीक असते. गुलाबाचे फुल त्याच आधारभूत संवेदनेचे प्रतीक. असं म्हणतात, गुलाब ज्याच्या हाती असतो, त्याचे अंतरंग त्याच्यात उमटते आणि म्हणूनच प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि प्रेमातील साधर्म्य ओळखण्यासाठी गुलाब सर्वश्रेष्ठ ठरते. व्हॅलेंटाइल विकची सुरुवात याच गुलाबापासून होते. मग काय, तुम्ही दिलंय का कधी कुणाला गुलाबाचं फुल..?
‘रोझ डे’ हा रोज रोज येत असला तरी ‘रोझ’ला अधिष्ठान देणारा नव्या पिढीतील दिवस म्हणजे ‘रोझ डे’. दररोज प्रेमाचा विनयभंग होत असल्याचे रस्तोरस्ती दिसत असते. कुणीतरी कुणाला तरी दिलेला गुलाब कडे-कपारित, मळवाहिनीच्या चिखलात, पायदळी तुडविले जाताना आढळतो. मात्र, या दिवसाला दिलेले फूल अनपेक्षितरीत्या सारेच कवटाळून असतात. कारण, आपण केलेला तिरस्कार पुढे कधी आपल्यावरच उलटू नये, ही भयकंपित करणारी भावना त्यामागे असते. हा झाला युगुल होऊ बघणाऱ्या तरुणाईचा किस्सा.
गुलाबाचे फुल केवळ प्रियकरानेच प्रेयसीला द्यावे, असा काही दंडक नाही. आई-वडील, बहीण-भाऊ, मित्र-मैत्रीण या निखळ, नि:स्पृह नात्यांची उंची वाढविण्यातही गुलाबाचे मोठे स्थान आहे. एवढेच कशाला, अध्यात्मातील अदृश्य अशा शक्तीला आणि वैज्ञानिक युगातील निसर्ग विचारांकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही गुलाबाचे महत्त्व आहे. गुलाबाच्या गुलाबी रंगामुळे मनातील भावना सहज उजागर होतात. म्हणूनच गुलाबाचे स्थान महत्त्वाचे ठरते. मग गुलाबाचे फूल घ्या आणि ज्यांच्या विषयी आस्था, निष्ठा, निश्च्छलता प्रेमपूर्वक व्यक्त करण्यासाठी बिनधास्त देऊन टाका... बघा नात्यातील गोडवा कसा हळुवार फुलेल.