एकही टाका न लावता केले ‘व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’; ‘टावी’ प्रक्रियेने वृद्धाला मिळाले जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2023 07:42 PM2023-06-24T19:42:16+5:302023-06-24T20:16:36+5:30
Nagpur News एकही टाका न लावता व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया नागपुरात यशस्वीरित्या पार पडली. ‘ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ (टावी) या पद्धतीने ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
नागपूर : ६७ वर्षीय रुग्णाच्या हृदयाला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणाऱ्या वाहिनीचा ‘एओर्टिक व्हॉल्व्ह’ निकामी झाला होता. रुग्णाला उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचाही त्रास होता. ‘कोमॉर्बिडिटीज’ असल्याने ‘ओपन हार्ट सर्जरी’मध्ये जोखीम होती. दुसरीकडे अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यूचा धोकाही होता. त्यामुळे ‘ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ (टावी) हाच एकमेव पर्याय होता. रुग्णाकडून याला संमती येताच, एक टाकाही न लावता हृदयात यशस्वी ‘व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ करून रुग्णाला जीवनदान देण्यात आले.
नागपुरात आता ‘टावी’ प्रक्रिया दुर्मिळ राहिली नाही. ‘मेड इन व्हॉल्व्ह’मुळे यातील खर्चही कमी झाला आहे. यामुळे वृद्ध व जोखमीच्या रुग्णांमध्ये या उपचाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. प्राप्त माहितीनुसार, या ६७ वर्षीय रुग्णाला थोडे जरी चालले की दम लागायचा. शिवाय, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचा अनेक वर्षांपासून त्रास होता. या गंभीर आजारांमुळे ‘ओपन हार्ट सर्जरी’ शक्य नव्हती. नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात हा रुग्ण उपचारासाठी आल्यावर डॉक्टरांनी तपासून ‘ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ करण्याचा सल्ला दिला. रुग्णाकडून संमती येताच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनमोल सोनावणे यांनी ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यांना हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नितीन तिवारी, डॉ. अमेय बीडकर, कार्डियोव्हॅस्कुलर सर्जन डॉ. समित पाठक, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. पंकज चौधरी जैन यांच्या चमूने सहकार्य केले. या उपचारानंतर रुग्णाला तीन दिवसात रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
- अशी होते प्रक्रिया
डॉ. बीडकर यांनी सांगितले, ‘टावी’मध्ये ॲन्जिओग्राफी व ॲन्जिओप्लास्टीप्रमाणे हातातून एक नळी (कॅथेटर) रक्तवाहिनीद्वारे हृदयापर्यंत नेण्यात येते. पेसमेकरद्वारे हृदय स्थिर केले जाते. कॅथेटरद्वारे नेण्यात आलेल्या व्हॉल्व्हला हृदयात उघडण्यात येते. व्हॉल्व्ह स्थिर झाला की, कॅथेटर काढून घेतली जाते. विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेत भूल देण्याची गरज पडत नाही. चीरही दिली जात नाही.
- ‘मेड इन व्हॉल्व्ह’मुळे खर्च कमी
डॉ. सोनावणे यांनी सांगितले, ‘टावी’ प्रक्रियेतून टाकलेला व्हॉल्व्ह हा साधारण १० ते १५ वर्षांच्या कालावधीसाठी असतो. पुन्हा ‘व्हॉल्व्ह’ बदलण्याची गरज पडू शकते. त्यामुळे ७५ किंवा त्यापेक्षा जास्त वय आणि जोखमीच्याच रुग्णांनी ही प्रक्रिया करायला हवी. तरुणांसाठी ही प्रक्रिया नाही. ‘मेड इन व्हॉल्व्ह’मुळे याचा खर्च कमी झाला आहे.
- जोखीम असणाऱ्यांसाठी वरदानच
‘टावी’ ही प्रक्रिया ज्यांना ओपन हार्ट सर्जरीची जोखीम आहे, त्यांच्यासाठी वरदानच आहे. हृदयशास्त्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता चिरफाड न करताही व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शक्य झाले आहे.
- डॉ. अमेय बीडकर, हृदयरोग तज्ज्ञ