व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सामान्यांच्या आवाक्याबाहेर - डॉ. प्रशांत जगताप
By सुमेध वाघमार | Published: March 13, 2023 05:19 PM2023-03-13T17:19:33+5:302023-03-13T17:19:59+5:30
‘कार्डिओ-थोरॅसिक सोसायटी’तर्फे ‘व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’वर चर्चा
नागपूर : ‘ओपन हार्ट सर्जरी’वर ‘ट्रान्सकॅथेटर’ प्रक्रियेने (टावर) हृदयाचा ‘व्हॉल्व्ह रिप्लसमेंट’ करण्याचा पर्याय उपलब्ध झाल्याने विशेषत: ७० वर्षांवरील ज्येष्ठ रुग्णांना जीवनदान मिळत आहे. ‘व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ची गरज असलेल्या रुग्णांची संख्या मोठी असली तरी यावरील खर्च मोठा आहे. परिणामी, गरीब व सामान्य रुग्णांना याचा फार कमी फायदा होत आहे, अशी माहिती प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत जगताप यांनी दिली.
‘कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’, विदर्भ चॅप्टर व ‘कार्डिओ-थोरॅसिक सोसायटी’, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टावी सिम्पोसिअम’चे आयोजन करण्यात आले होते. ‘एरोट्रिक व्हॉल्व्ह’ दोन प्रकारचे असतात. यातील कोणता व्हॉल्व्ह कोणत्या प्रकारच्या रुग्णांसाठी योग्य ठरताे, या विषयावर डॉ. जगताप बोलत होते.
यावेळी वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. कीर्ती पुनामिया, डॉ. हरेश मेहता, डॉ. स्वप्नील देशपांडे यांनीही परिसंवादात मार्गदर्शन केले. नियंत्रक म्हणून डॉ. अविनाश शर्मा, डॉ. महेश फुलवाणी, डॉ. शैलेंद्र गुंजेवार, डॉ. अनुज सारडा, डॉ. सतीश दास व डॉ. प्रमोद मुंद्रा सहभागी झाले होते. डॉ. कीर्ती पुनामिया, डॉ. हरेश मेहता, डॉ. अजिज खान व डॉ. ओमशुभम आसई यांनी सूत्रसंचालन केले. स्वागत भाषण ‘सीएसआय’चे अध्यक्ष डॉ. विपुल सेता यांनी केले. काार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे सचिव डॉ. अमर आमले यांनी प्रास्ताविक केले तर कार्डिओ -थोरॅसिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. निकुंज पवार यांनी आभार मानले.
- भारतात वर्षाला २ ते ३ हजार व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट
डॉ. जगताप म्हणाले, जर्मनीत वर्षाला जवळपास ३० ते ४० हजार व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट होत असताना, भारतात ही संख्या २ ते ३ हजार आहे. या उपचारांचा खर्च सर्वांना परवडेल असा नाही.