शस्त्रक्रियेविना बदलला हृदयाचा ‘वॉल्व्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:37 PM2018-11-17T23:37:44+5:302018-11-17T23:41:13+5:30
हृदयविकाराच्या रुग्णांसाठी खूशखबर आहे. हृदयाचा वॉल्व्ह खराब झाल्यास त्यांना महागड्या आणि त्रासदायक सर्जरीतून जावे लागणार नाही. कारण आता नागपुरात शस्त्रक्रियेविना वॉल्व्ह बदलता येऊ शकतो. शुक्रवारी रामदासपेठ येथील अर्नेजा हार्ट अॅण्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे वरिष्ठ इंटरव्हेंशनल कॉर्डियोलॉजिस्ट डॉ. जसपाल अर्नेजा आणि त्यांच्या चमूने ट्रान्सकॅथेटर एओर्टिक वॉल्व्ह रिप्लेसमेंट (टीएव्हीआर) प्रक्रिया केवळ दीड तासात यशस्वीरीत्या केली. रुग्ण २४ तासातच चालू लागला, हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हृदयविकाराच्या रुग्णांसाठी खूशखबर आहे. हृदयाचा वॉल्व्ह खराब झाल्यास त्यांना महागड्या आणि त्रासदायक सर्जरीतून जावे लागणार नाही. कारण आता नागपुरात शस्त्रक्रियेविना वॉल्व्ह बदलता येऊ शकतो.
शुक्रवारी रामदासपेठ येथील अर्नेजा हार्ट अॅण्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे वरिष्ठ इंटरव्हेंशनल कॉर्डियोलॉजिस्ट डॉ. जसपाल अर्नेजा आणि त्यांच्या चमूने ट्रान्सकॅथेटर एओर्टिक वॉल्व्ह रिप्लेसमेंट (टीएव्हीआर) प्रक्रिया केवळ दीड तासात यशस्वीरीत्या केली. रुग्ण २४ तासातच चालू लागला, हे विशेष. या प्रक्रियेचे सॅटेलाईटद्वारे थेट प्रसारण वापीमध्ये (गुजरात) सुरू असलेल्या एका परिषदेत २०० डॉक्टरांनी पाहिले. सोप्या पद्धतीने वॉल्व बदलण्याचा यशस्वी प्रयोग मध्य भारतात पहिल्यांदा घडला आहे. अशा प्रक्रियेसाठी डॉ. अर्नेजा मध्य भारतात पहिले हृदयरोगतज्ज्ञ बनले आहेत.
प्रक्रियेनंतर लोकमतशी चर्चेदरम्यान डॉ. अर्नेजा म्हणाले, दोन दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट निवासी ८३ वर्षीय कृष्णा गोविंद पाहुणे हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आले होते. त्यांना चालताना श्वास घेण्यास त्रास व्हायचा. हृदयाच्या डाव्या बाजूच्या धमनीचा वॉल्व्ह अंकुचित झाल्याचे तपासणीत दिसून आले. पाहुणे यांचे वय पाहता त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे ही जोखिम असल्याचे मत डॉक्टरांनी मांडले. शस्त्रक्रियेविना वॉल्व्ह बदलण्याचा पर्याय सर्वोत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अहवाल आणि डॉक्टरांचा सल्ला पाहता पाहुणे यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली आणि त्यांची स्थिती सांगितली. सोबतच नवीन उपचार पद्धतीची माहिती दिली. कुटुंबीयांनी होकार दिल्यानंतर दोन दिवसांपूर्वी पाहुणे यांना भरती केले. त्यानंतर शुक्रवार, १६ नोव्हेंबरला कुठलीही चिरफाड न करता हृदयाचा वॉल्व बदलून कृत्रिम वॉल्वचे रोपण केले. पाहुणे आता सामान्य आहेत. काही दिवसानंतर त्यांना सुटी देण्यात येईल.
डॉक्टरांच्या चमूमध्ये डॉ. अभय ठाकरे, डॉ. अभिषेक वडस्कर, डॉ. अमर आमले, डॉ. विवेक मांडूरके यांचा समावेश होता.
नवीन चिकित्सा प्रक्रिया अत्यंत उपयोगी
डॉ. अर्नेजा यांनी सांगितले की, सध्याच्या काळात ट्रान्सकॅथेटर एओर्टिक वॉल्व्ह रिप्लेसमेंट (टीएव्हीआर) सर्जरी अत्यंत उपयोगी असून एकप्रकारे वरदानच आहे. कारण प्रत्येक हृदयरोगी ओपनहार्ट सर्जरीसाठी सक्षम नसतो. विशेषत: ७० वर्षांवरील रुग्णांवर सर्जरी करणे एक जोखिमच असते. देशातील काही हॉस्पिटलमध्ये या प्रक्रियेंतर्गत वॉल्व्ह बदलण्यात आला आहे. मुंबई आणि पुण्यात काही रुग्णांचे वॉल्व्ह या प्रक्रियेच्या माध्यमातून बदलले आहेत. नागपूसह मध्य भारतात पूर्वी अशी प्रक्रिया झालेली नव्हती. ८३ वर्षीय रुग्णावर शस्त्रक्रियेविना वॉल्व्ह बदलण्यात यश आल्याबद्दल डॉ. अर्नेजा यांनी आनंद व्यक्त केला.
अशी आहे प्रक्रिया
डॉ. अर्नेजा म्हणाले, पर्क्यूटेनिअस एओर्टिक वॉल्व्ह रिप्लेसमेंटमध्ये त्वचेतूनच कॅथेटरचा (नलिका) उपयोग करून कृत्रिम वॉल्व्ह लावण्याची ही प्रक्रिया नवीन आहे. पूर्णपणे नॉनसर्जिकल तंत्रज्ञान आहे. कृत्रिम वॉल्व्हला जांघेतून शस्त्रक्रियेविना बदलण्यात आले. एन्जियोप्लास्टीप्रमाणेच सुईने जांघेच्या नसेमध्ये एक छोटे छिद्र करण्यात आले. रुग्णाला ड्रग कंट्रोलर जनरल आॅफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त कृत्रिम वॉल्व्ह लावण्यात आला.