‘वंदे मातरम्’ला विरोध खेदजनकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:53 AM2017-07-30T00:53:02+5:302017-07-30T00:53:23+5:30
स्वातंत्र्यलढ्यामध्ये ‘वंदे मातरम्’ने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली होती. राष्ट्रचेतनेचे व शक्तीचे प्रतीक असलेले हे गीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्यलढ्यामध्ये ‘वंदे मातरम्’ने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली होती. राष्ट्रचेतनेचे व शक्तीचे प्रतीक असलेले हे गीत आहे. मात्र आता धर्माच्या नावावर ‘वंदे मातरम्’ला होणारा विरोध हा अतिशय खेदजनक प्रकार आहे. ज्याला ‘वंदे मातरम्’ कळते त्याला देश कळतो, असे मत ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांनी व्यक्त केले. वामन गाणार लिखित ‘अंदमान की व्यथा, निकोबार की कथा’ या पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते.
नाथे पब्लिकेशनतर्फे पत्रकार भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाऊसाहेब झिटे हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सोबतच मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती किशोर रोही, माजी मंत्री नानाभाऊ एंबडवार, सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, संजय नाथे हे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘वंदे मातरम्’ या गीताने देशभरात स्फुल्लिंग जागविले होते. त्याला धर्म, पंथाच्या मर्यादा नव्हत्या. क्रांतिकारक अशफाक उल्ला खान यांनी तर फाशीवर जाताना ‘वंदे मातरम्’चाच नारा दिला होता. असे असताना धर्माच्या नावावर आता याच गीताला विरोध होत आहे ही दुर्दैवी बाब आहे, असे सुधाकर गायधनी म्हणाले. स्वातंत्र्याच्या चळवळीत अगणित लोकांनी हौतात्म्य पत्करले. मात्र अद्यापही स्वातंत्र्यलढ्याचा संपूर्ण इतिहास हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळेच स्वातंत्र्याची किंमत लोकांना कळत नाही, असे मत नानाभाऊ एंबडवार यांनी व्यक्त केले. माजी न्यायमूर्ती किशोर रोही यांनी अंदमान-निकोबारचा इतिहास, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग आणि तेथील आताच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला. अंदमान-निकोबारचा इतिहास सर्वार्थाने नागरिकांसमोर येण्याची आवश्यकता आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने हे कसब साधले आहे, असे प्रतिपादन भाऊसाहेब झिटे यांनी केले. शिवाजी बोडखे, संजय नाथे यांनीदेखील यावेळी आपले मत व्यक्त केले. तसेच लेखक वामन गाणार यांनी पुस्तक लेखनाच्या प्रवासावर भाष्य केले.
ज्येष्ठ संघ विचारक मा.गो.वैद्य हेदेखील या कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करणार होते. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे ते सभागृहात येऊ शकले नाही. मात्र त्यांनी प्रकाशन समारंभाअगोदर उपस्थित राहून आपल्या शुभेच्छा दिल्या.