आपसी वादातून दुचाकी वाहनांची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:09 AM2021-01-21T04:09:48+5:302021-01-21T04:09:48+5:30
नागपूर : शस्त्राच्या धाकावर वाहनांची तोडफोड करण्याचा देवधर मोहल्ल्यातील प्रकरण तहसील पोलिसांनी निस्तरले आहे. या घटनेतील सूत्रधारासह तीन आरोपींना ...
नागपूर : शस्त्राच्या धाकावर वाहनांची तोडफोड करण्याचा देवधर मोहल्ल्यातील प्रकरण तहसील पोलिसांनी निस्तरले आहे. या घटनेतील सूत्रधारासह तीन आरोपींना अटक केली आहे. जुन्या वादातून आणि आईला धमकी दिल्यामुळे आरोपींनी चिडून जाऊन हे कृत्य केले. अमन चौडे, आशिष चिंचघरे तसेच निखिल बिनेकर यांचा यात समावेश आहे. अमनचा भाऊ आकाश आणि अन्य एका साथीदाराचा तपास पोलीस घेत आहेत. १७ जानेवारीला रात्री ही घटना घडली. देवधर मोहल्ल्यातील अरुण बाजीराव यांना रात्री तोडफोड करण्याचा आवाज आल्याने ते घराबाहेर आले. काठ्या आणि शस्त्र घेतलेले पाच-सहा युवक दुचाकीची तोडफोड करताना त्यांना दिसले. एमएच/४९/पी/६४१६, एमएच/४९/के/३०३५ तसेच एमएच/३१/एटी/४०८७ क्रमांकाच्या वाहनांच्या तोडफोड करून ते पसार झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. तहसील पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली. तपासादरम्यान अमन चौडे हा यात सहभागी असल्याची माहिती हाती लागली. तो कुख्यात गुन्हेगार आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. आधी टाळाटाळ करून नंतर मात्र त्याने खरी माहिती दिली.
बाजीराव यांचा मुलगा हिमांशु याच्याशी अमनचा जुना वाद आहे. काही दिवसांपूर्वी दोघात बराच वादही झाला होता. त्या दिवशी दुपारी अमनच्या घरी येऊन हिमांशुने त्याच्या आईला ‘तुझ्या मुलाचा गेम करू’ अशी धमकी दिली होती. अमनला हे कळल्यावर तो संतप्त झाला. त्याचा भाऊ आकाश आणि मित्र आशिष चिंचघरे हेसुद्धा गुन्हेगार वृत्तीचे आहेत. अमनने भावाच्या मदतीने अन्य पाच साथीदारांना हाताशी घेऊन ही घटना घडवून आणली. पोलिसांनी बाजीरावला कुणासोबत वाद आहे का, असे विचारल्यावरही त्याने उत्तर टाळले होते. या घटनेमुळे वरिष्ठ अधिकारीही गंभीर झाले होते. मात्र तहसील पोलिसांनी आरोपींना शोधल्याने प्रकरण निस्तरले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर, एएसआय दुबे, हवालदार चतुर्वेदी यांनी पार पाडली.