‘वंदे भारत’ : २७ थांबे... जंगी स्वागत तरी आठ तासांत गाठले बिलासपूर!

By नरेश डोंगरे | Published: December 11, 2022 11:41 PM2022-12-11T23:41:45+5:302022-12-11T23:43:13+5:30

अनेक वैशिष्ट्यांनी ओतप्रोत असलेल्या वंदे भारत ट्रेनचे नागपूर ते बिलासपूर या सुमारे साडेचारशे किलोमीटर अंतरावर आजपासून आवागमन सुरू झाले.

'Vande Bharat': 27 stops... Despite a wary welcome, reached Bilaspur in eight hours! | ‘वंदे भारत’ : २७ थांबे... जंगी स्वागत तरी आठ तासांत गाठले बिलासपूर!

‘वंदे भारत’ : २७ थांबे... जंगी स्वागत तरी आठ तासांत गाठले बिलासपूर!

googlenewsNext

नागपूर : वंदे भारत ट्रेनला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर रेल्वेस्थानकावरून सकाळी ९.५४ वाजता ग्रीन सिग्नल दिला अन् महाराष्ट्र तसेच छत्तीसगडच्या दळणवळणाचा धागा घट्ट करत वायुवेगाने ती बिलासपूरकडे निघाली. मार्गात तब्बल २७ ठिकाणी हारतुरे अन् स्वागत स्वीकारण्यासाठी ती थांबली. मात्र, लगेच पुन्हा ऐट दाखवत तिने अवघ्या आठ तासात बिलासपूर गाठले.

प्रवासाची एक वेगळी अनुभूती देणाऱ्या वंदे भारत ट्रेनला रेल्वेलाइनवर चालणारे विमान म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. अनेक वैशिष्ट्यांनी ओतप्रोत असलेल्या वंदे भारत ट्रेनचे नागपूर ते बिलासपूर या सुमारे साडेचारशे किलोमीटर अंतरावर आजपासून आवागमन सुरू झाले. तिच्या पहिल्या प्रवासाचा सोहळा ऐतिहासिकच ठरला. तिला शुभारंभाचा शगून दाखविण्यासाठी रेल्वेस्थानकावर एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी खास पंतप्रधान मोदी रेल्वेस्थानकावर आले. त्यांच्यासोबतच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

नवरीसारखी नटून थटून फलाट क्रमांक एकवर उभ्या असलेल्या ‘वंदे भारत’च्या कोचचे निरीक्षण करून पंतप्रधानांनी ऑनबोर्ड सुविधांचा आढावा घेतला. त्यानंतर कंट्रोल रूम गाठत ट्रेन संचालनाची माहिती घेतली. दरम्यान, स्टाफशी चर्चा करून मोदींनी तिला हिरवा झेंडा दाखवला अन् पुढच्या काही क्षणातच ती वाऱ्यावर स्वार झाली. ६६८ निमंत्रितांना आणि पन्नासेक पत्रकारांना घेऊन कामठी, कन्हान स्थानकांना धावती भेट देत अवघ्या तासाभरात तिने भंडारा रेल्वेस्थानक गाठले. येथे प्रवासी, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक, स्थानिक नेत्यांनी तिला अक्षता लावून ओवाळले. बॅण्डच्या गजरात फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत चालकासह अन्य कर्मचाऱ्यांना मिठाई खाऊ घालण्यात आली. त्यानंतर तिरोडा, तुमसर, कोकातील दोन दोन मिनिटांचे स्वागत स्वीकारून ती दुपारी १२ च्या सुमारास गोंदिया स्थानकावर पोहचली. 

येथेही तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर राजनांदगाव, दुर्ग, रायपूर आणि मधे-मधे अनेक छोट्या स्थानकांवर अशाच प्रकारचा स्वागत सोहळा आटोपून सायंकाळी ६ च्या सुमारास ती बिलासपूरला पोहचली. येथे तिच्या स्वागताची जोरदार तयारी करून ठेवण्यात आली होती. स्थानकाला नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती. मोठ्या संख्येतील नागरिक, त्यांची घोषणाबाजी, ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण, कागदांची उधळण करणारे साैम्य स्वरूपाचे फटाके अशा प्रचंड उत्साहात वंदे भारतचा आजचा पहिला ऐतिहासिक प्रवास थांबला. सोमवारी ती पुन्हा नागपूरकडे येणार आहे.

गावोगावची मंडळी, मोहक रूपावर फिदा
प्रवासाच्या दरम्यान तिला बघण्यासाठी तिचे मोहक रूप आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी नागपूर ते बिलासपूर रेल्वे मार्गावरील मोठ्या स्थानकांवरच नव्हे तर विविध छोट्या गावांच्या स्थानकांवर, रेल्वे फाटकांवर मोठ्या संख्येत नागरिकांनी गर्दी केली होती. त्यांच्या देहबोलीतून ते वंदे भारतच्या रूपा-गुणांवर भाळल्याचे जाणवत होते.

ठिकठिकाणी झाले ‘लाइव्ह’
प्रवासादरम्यान पहिल्या डब्यापासून १६ व्या डब्यापर्यंत विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी ‘लाइव्ह’ करून तिचे गुणगान करून देशातील जनेतला वैशिष्ट्य सांगत होते. नागपूर, बिलासपूरच नव्हे तर मुंबई, महाराष्ट्रासह, छत्तीसगड, मध्यप्रदेश, दिल्ली, राजस्थानमधूनही विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि कॅमेरामन वंदे भारतमधील प्रवास कसा आरामदायक आहे, ते कथन करीत होते.

काय ती गती, काय ती गाडी, एकदम ओक्केच!
काय त्या सीटा, काय ती गती, काय ती गाडी, एकदम ओक्केच आहे. तिच्या दाराजवळ जाताच ते आपोआप उघडते अन् आपसूकच बंदही होते. सीटवर बसल्यानंतर ती पाहिजे त्या दिशेने (रिव्हॉल्व्हिंग) फिरविता येते. विमानाने आकाशात झेप घ्यावी, तशी ती वाऱ्यावर स्वार होऊन वायुवेगाने समोर निघते. या शिवायही तिची अनेक वैशिष्ट्ये आहेत. थोडक्यात सांगायचे म्हटले तर काय ती गती, काय ती गाडी, एकदम ओक्केच!

Web Title: 'Vande Bharat': 27 stops... Despite a wary welcome, reached Bilaspur in eight hours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.