पॅसेंजर कृपया ध्यान दे... 'ब्रेक के बाद' उद्यापासून वंदे भारत एक्सप्रेस रुळावर
By नरेश डोंगरे | Published: May 16, 2023 11:43 PM2023-05-16T23:43:33+5:302023-05-16T23:43:55+5:30
खूषखबर, नवीन रॅक मिळाली, बुधवारपासून आधीसारखीच धावणार!
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: नागपूर-बिलासपूर आणि बिलासपूर-नागपूर रेल्वेमार्गावर सुसाट धावणारी आलिशान 'वंदे भारत एक्स्प्रेस' तीन दिवसांच्या 'ब्रेक के बाद' पुन्हा त्याच वेगात रुळावर धावणार आहे. रविवार, दि. १४ मेपासून वंदे भारतला ब्रेक लागला होता. त्याऐवजी या मार्गावर 'तेसज एक्स्प्रेस' सुरू करण्यात आली होती, हे विशेष!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ ला नागपूर - बिलासपूर- नागपूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला नागपूर रेल्वेस्थानकावरून हिरवी झेंडी दाखविली होती. त्यानंतर विविध वैशिष्ट्यांनी नटलेल्या वंदे भारतचे प्रवाशांकडून मोठे काैतुक होत होते. भारतातील एक आलिशान रेल्वेगाडी म्हणून वंदे भारतकडे बघितले जात होते. या मार्गावर तिला प्रवाशांकडून प्रतिसादही चांगला मिळत होता. मात्र, रॅकच्या कमतरतेमुळे अचानक नागपूर - बिलासपूर-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस (ट्रेन नंबर २०८२५/ २०८२६) ला तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली. त्या बदल्यात दि. १४ मेपासून तेजस एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. सिकंदराबाद तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेस २०७०१ / २०७०२चे रॅक प्राप्त होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात हा बदल करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहिर केले होते. दरम्यान, रॅक प्राप्त झाल्यामुळे तीन दिवसांच्या ब्रेक नंतर बुधवार, दि. १७ मे पासून वंदे भारत पुन्हा नागपूर - बिलासपूर - नागपूर मार्गावर धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
प्रवाशांना दिलासा
महाराष्ट्र-छत्तीसगड अशा दोन प्रांतांना रेल्वेमार्गे जोडणाऱ्या वंदे भारतचे परिचालन बंद झाल्याने प्रवाशांची खास करून व्यापाऱ्यांची, छत्तीसगडहून रुग्णांना घेऊन नागपुरात येणारांची मोठी गैरसोय झाली होती. आता पुन्हा वंदे भारत सुरू झाल्याने त्या सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. बुधवारपासून सुरू होणाऱ्या वंदे भारत मध्ये १ एक्झिकेटीव्ह क्लास कोच तसेच ७ चेअर कार कोच राहणार आहे.