कॅनडातील भारतीय विद्यार्थ्यांसाठी सुरू व्हावी ‘वंदे भारत’ सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:12 AM2021-08-15T04:12:25+5:302021-08-15T04:12:25+5:30
मेहा शर्मा नागपूर : कॅनडा सरकारने भारतातून येणाऱ्या विमानांवर अनिश्चित काळासाठी निर्बंध घातले आहेत. कॅनडा सरकारने भारतातील आरटी-पीसीआर टेस्ट ...
मेहा शर्मा
नागपूर : कॅनडा सरकारने भारतातून येणाऱ्या विमानांवर अनिश्चित काळासाठी निर्बंध घातले आहेत. कॅनडा सरकारने भारतातील आरटी-पीसीआर टेस्ट रिपाेर्टच अमान्य करीत ही बंदी घातली आहे. प्रवाशांना टेस्ट रिपाेर्टसाठी दुसऱ्या देशाची चक्कर मारून, अवाढव्य खर्च करून कॅनडाचा प्रवास करावा लागताे. त्यामुळे अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘वंदे भारत’ सारखी सेवा सुरू करण्याची मागणी जाेर धरत आहे.
यावर्षी एप्रिल महिन्यात भारतातून कॅनडाला गेलेल्या जवळपास सर्वच विमानांमधील अनेक प्रवासी आरटीपीसीआर टेस्टचा निगेटिव्ह रिपाेर्ट सादर करूनही काेराेना संक्रमित आढळून आले हाेते. अशाने कॅनडातील निर्बंधामुळे प्रवाशांना व विशेषत: भारतीय विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून पुन्हा महाविद्यालयात उपस्थित राहण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सरसकट निर्बंध लादण्याऐवजी कॅनडा प्रशासनाने भारतातील काही रुग्णालयांची निवड करून त्यातील आरटी-पीसीआर रिपाेर्टचा स्वीकार करावा, असा सल्ला जाणकारांनी दिला आहे. सध्या अमिरात, लुफ्तान्सा आणि फ्रान्सच्या विमानांना कॅनडामध्ये आवागमनाची परवानगी आहे; मात्र भारतातून या देशातील विमानसेवेचा लाभ घेणे अडचणीचे आहे कारण त्यासाठी स्वतंत्र व्हिजा काढावा लागताे. केवळ मालदीव असा देश आहे, जिथे व्हिजा न घेता जाऊन कॅनडाकडे प्रवास करता येताे. त्यामुळे ज्या भारतीयांनी कॅनडा प्रवासाचे नियाेजन केले आहे त्यांना आधी मालदीव गाठावे लागते. तेथूनते कॅनडाकडे प्रवास करतात. मात्र, हा प्रवास अतिशय महागडा ठरताे. कारण त्यांना आधी मालदीवला जाऊन आरटी-पीसीआर टेस्ट करण्यासाठी दाेन-तीन दिवस मुक्काम करावा लागताे आणि त्यानंतरच निगेटिव्ह असल्याचा रिपाेर्ट घेऊन कॅनडाकडे रवाना हाेता येते. हा इतका ससेमिरा आतापर्यंत अनेक भारतीयांना करावा सुद्धा लागला आहे.
विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास न परवडणारा ठरला आहे. पूर्वी भारतातून कॅनडाला थेट जाण्यासाठी ७५,००० रुपये खर्च येत हाेता. मात्र सध्या अशाप्रकारे ससेमिरा करून २.१५ ते २.३० लाख रुपये खर्च करावे लागत असून हा एकाच बाजूचा प्रवास आवाक्याच्या बाहेर जात आहे. कॅनडात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असा प्रवास करीत जाणे म्हणजे पालकांच्या खिशाला भगदाड पाडण्यासारखे झाले आहे. त्यामुळे ‘वंदे भारत’सारख्या सेवेचे नियाेजन करून काेराेना टेस्ट निगेटिव्ह असलेल्या विद्यार्थ्यांच्या थेट प्रत्यार्पणासाठी एअर इंडिया व एअर कॅनडामध्ये समन्वय स्थापित करणे आवश्यक असल्याचे सुचविले जात आहे.
त्रयस्त देशात १४ दिवस क्वारंटाईनची अट
- कॅनडाच्या अधिकृत वेबसाईटनुसार एखादा प्रवासी ट्रान्झिट देशात काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आल्यास त्याला त्रयस्त देशात १४ दिवस क्वारंटाईन राहावे लागेल. त्यामुळे साहजिकच त्या प्रवाशाला क्वारंटाईन काळादरम्यान माेठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागेल; मात्र नकारात्मक चाचणी अहवाल असल्यास दाेन-तीन दिवसात त्यांना देश साेडता येईल.
भारताने कॅनडा सरकारशी चर्चा करावी
- भारतीय विद्यार्थी तसेच सामान्य प्रवाशांचाही विचार करीत केंद्र सरकारने हा विषय गंभीरतेने घेत कॅनडा सरकारशी बाेलून या समस्येतून लवकरात लवकर मार्ग काढण्याची गरज आहे, अशी भावना बहुतेक विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून व्यक्त केली जात आहे. ही भावना देशातील अनेक ट्रॅव्हल एजन्सीची सुद्धा आहे. त्यांनाही दरराेज मनस्ताप सहन करणाऱ्या विद्यार्थी व पालकांच्या निराशेचा सामना करावा लागत आहे.