वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह

By नरेश डोंगरे | Published: September 16, 2024 10:44 PM2024-09-16T22:44:55+5:302024-09-16T22:45:13+5:30

सेवाग्राम आणि चंद्रपूरमध्ये जोरदार स्वागत

Vande Bharat third impressive visit to Nagpur; Off to Secunderabad; Reached Ballarshah in 3 hours | वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह

वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी अशा विशेष निमंत्रित प्रवाशांना घेऊन दिमाखदारपणे सफरीवर निघालेल्या नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसने अवघ्या तीन तासांत २१२ किलोमीटरवर आणि महाराष्ट्राच्या टोकावर असलेले बल्लारशाह गाठले. येथे या ट्रेनचे जोरदार स्वागत करण्यात आले.

गेल्या दोन वर्षांत नागपूरहून सुरू झालेली ही तिसरी वंदे भारत ट्रेन आहे. यापूर्वी नागपूर जबलपूर आणि त्यानंतर नागपूर इंदोर या दोन वंदे भारत एक्स्प्रेस नागपूरहून सुरू करण्यात आल्या असून या गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर येथील मुख्य रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वर सोमवारी नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सजूनधजून उभी होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील मुख्य कार्यक्रमातून नागपूर सिकंदराबादसह देशभरातील विविध मार्गांवर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखविली. दरम्यान, नागपूर येथे आयोजित कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आ.कृपाल तुमाने, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा, विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल तसेच अन्य गणमान्य तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही प्रदेशाच्या विकासासाठी रोड, रेल्वे अन् हवाई कनेक्टीव्हिटी महत्त्वाची ठरते. देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नागपुरात या सोयी चांगल्या आहे. आज त्यात वंदे भारतची भर पडली. आता दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांच्या संख्येत वाढ व्हावी, असे मनोगत राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी व्यक्त केले. तर, नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसमुळे दक्षिणेकडील राज्याशी नागपूरची कनेक्टीव्हिटी अन् विकासही अधिक वाढेल, असे मत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नोंदविले.

शुभेच्छा, टाळ्या अन् ढोलताशांचा गजर

राज्यपाल राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वंदे भारतच्या लोको पायलटला शुभेच्छा देत हिरवी झेंडी दाखविली. यावेळी टाळ्या आणि ढोलताशांचा गजर झाला. दरम्यान, सिकंदराबादकडे निघालेल्या या गाडीत साडेआठशेवर विद्यार्थी आणि चारशेवर निमंत्रित प्रवासी होते. नागपूरहून ३:५५ वाजता निघाल्यानंतर सेवाग्राम (वर्धा) स्थानकावर ही गाडी थांबली. तेथून स्वागत सत्कार स्वीकारल्यानंतर तिने थेट चंद्रपूर आणि त्यानंतर रात्री ७:१५ च्या सुमारास बल्लारशाह स्थानक गाठले. तेथेही वंदे भारतचे जोरदार स्वागत करण्यात आले. नंतर, ही गाडी सिकंदराबादकडे रवाना झाली.

विद्यार्थ्यांना वंदे भारतची सफर

सोमवारी ईदनिमित्त शहरातील सर्व शाळेला सुटी होती. मात्र, वंदे भारतच्या शुभारंभाला शहरातील श्री गुरू गोविंद सिंग गड्डीगोदाम, सेंट विन्सेंट पल्लोटी स्कूल अनंतनगर यासह इतर शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांसह बोलावण्यात आले होते. तसेच एनसीसीचे विद्यार्थीसुद्धा सहभागी झाले होते. रेल्वेकडून विद्यार्थ्यांना वंदे भारतचा प्रवास घडविण्यात आला. शाळेतील विद्यार्थी दुपारी २ वाजतापासून फलाटावर दाखल झाले. मात्र, कार्यक्रम उशिरा सुरू झाल्याने त्यांना ताटकळत राहावे लागले.

Web Title: Vande Bharat third impressive visit to Nagpur; Off to Secunderabad; Reached Ballarshah in 3 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.