'वंदे भारत'कडून महिनाभरात ३६ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2023 07:00 AM2023-01-21T07:00:00+5:302023-01-21T07:00:11+5:30

Nagpur News मध्य भारतातील महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांना जोडणाऱ्या हायस्पीड वंदे भारत ट्रेनने अवघ्या महिनाभरात ३६ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली आहे.

Vande Bharat transports more than 36 thousand passengers in a month | 'वंदे भारत'कडून महिनाभरात ३६ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक

'वंदे भारत'कडून महिनाभरात ३६ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक

googlenewsNext
ठळक मुद्देरेल्वेच्या तिजोरीत घसघशीत गंगाजळीपावणेतीन कोटींपेक्षा जास्त कमाई

नरेश डोंगरे 

नागपूर : मध्य भारतातील महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांना जोडणाऱ्या हायस्पीड वंदे भारत ट्रेनने अवघ्या महिनाभरात ३६ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली आहे. एवढेच नव्हे तर रेल्वेच्या तिजोरीत घसघशीत अशी पावणेतीन कोटी रुपयांची गंगाजळीही ओतली आहे.

नागपूर ते बिलासपूर या मार्गावर ११ डिसेंबर २०२२ ला ही आलिशान रेल्वेगाडी सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वेगाडीला हिरवी झेंडी दाखवली होती. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या हायस्पीड वंदे भारत ट्रेनमध्ये इतक्या सोयी-सुविधा अन् वैशिष्ट्ये आहेत की, तिच्यात प्रवास करणाऱ्यांना ती धक्का न लागू देता त्यांच्या इच्छित स्थानकावर सोडते. यापूर्वी नागपूर ते बिलासपूर हा रेल्वेमार्गाचा प्रवास १० ते ११ तासांचा होता. तो वंदे भारतमुळे केवळ साडेपाच तासांचा झाला आहे. या रेल्वेत अन्य सोयीसुविधांसह गरमागरम जेवण, शीतपेय, ऑन डिमांड वायफाय उपलब्ध आहे. त्यामुळे मध्य आणि उच्चवर्गीय प्रवासी, तसेच व्यापारी बांधव या गाडीला पसंती दर्शवीत आहेत.

मध्य भारतातील महत्त्वाचे प्रमुख शहर मानल्या जाणाऱ्या नागपुरात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील व्यापारी बांधवांची मोठ्या प्रमाणात रोजच ये-जा असते. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार, ही गाडी बिलासपूरहून सकाळी ६:४५ वाजता सुटते आणि नागपुरात दुपारी १२:१५ वाजता पोहोचते.

त्याचप्रमाणे नागपूरहून ती रोज दुपारी २:०५ वाजता सुटते आणि रात्री ७:३५ वाजता बिलासपूरला पोहोचते. मार्गातील रायपूर, दुर्ग, राजनांदगाव आणि गोंदिया या चार स्थानकांवर हिचे थांबे आहेत. अर्थात सकाळी व्यापार-व्यवसायाच्या निमित्ताने निघालेले व्यापारी रात्री आपल्या घरी पोहोचतात. त्यामुळे या रेल्वेगाडीला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

११ डिसेंबरला ही रेल्वेगाडी सुरू झाली तरी ती विशेष निमंत्रितांनाच येथून बिलासपूरला घेऊन गेली होती. त्यामुळे तिची व्यावसायिक प्रवासी सेवा खऱ्या अर्थाने १२ डिसेंबर २०२२ ला सुरू झाली. तेव्हापासून तो १३ जानेवारी २०२३ या महिनाभरात वंदे भारतमध्ये १७ हजार ८२२ प्रवाशांनी नागपूर ते बिलासपूर प्रवास करून १ कोटी ४५ लाख ९४ हजार ६७८ रुपयांचा महसूल दिला. याच महिनाभराच्या कालावधीत वंदे भारतमध्ये १८ हजार ५२९ प्रवाशांनी बिलासपूर ते नागपूर प्रवास करून वंदे भारतला १ कोटी ३९ लाख १३ हजार ४६७ रुपये दिले.

सुरक्षेवर विशेष भर !

वंदे भारतमध्ये सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला आहे. प्रवाशांना आकस्मिक अडचण आल्यास ते आपत्कालीन परिस्थितीत थेट ट्रेनच्या चालकाशी आणि अन्य कर्मचाऱ्यांशी बोलू शकतात. सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही असून प्लॅटफॉर्म साइड कॅमेरेदेखील आहेत. डब्याच्या बाहेर रिअरव्ह्यू कॅमेऱ्यांचा समावेश आहे. सर्व डबे पूर्णपणे सीलबंद गँगवेद्वारे एकमेकांशी संलग्न आहेत.

----

Web Title: Vande Bharat transports more than 36 thousand passengers in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.