भाजपच्या गडावर वंजारींची स्वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:11 AM2020-12-05T04:11:38+5:302020-12-05T04:11:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, नितीन गडकरी-देवेंद्र फडणवीस यांचे गृहनगर असलेल्या नागपूरच्या पदवीधर मतदारसंघातील भाजपची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, नितीन गडकरी-देवेंद्र फडणवीस यांचे गृहनगर असलेल्या नागपूरच्या पदवीधर मतदारसंघातील भाजपची मक्तेदारी तब्बल ५८ वर्षांनंतर मोडित निघाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांच्यावर १८ हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला.
वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती व पाचव्या फेरीपर्यंत त्यांची आघाडी वाढतच गेली. शुक्रवारी पहाटे घोषित झालेल्या पाचव्या फेरीच्या निकालाअखेर वंजारी यांच्याकडे १४ हजार ४०७ इतके मताधिक्य होते. वैध मतांची आकडेवारी लक्षात घेता विजयासाठी ६० हजार ७४७ चा कोटा निश्चित करण्यात आला. मात्र एकाही उमेदवाराला इतकी मते न मिळाल्याने दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीला सुरुवात झाली. शुक्रवारी दुपारी १७ व्या बाद फेरीनंतर वंजारी यांनी मतांचा कोटा पूर्ण केला. त्यांना ६१ हजार ७०१ तर संदीप जोशी यांना ४२ हजार ७९१ मते प्राप्त झाली. वंजारी यांनी १८ हजार ७१० मतांनी जोशी यांचा पराभव केला. संदीप जोशी यांना भाजपने ऐनवेळी उमेदवारी जाहीर करत धक्का दिला होता. मात्र भाजपच्या उमेदवार बदलाला मतदारांनी नाकारले.
मतांची आकडेवारी
उमेदवार -पक्ष -मिळालेली मते
अभिजित वंजारी- महाविकासआघाडी -६१,७०१
संदीप जोशी-भाजप -४२,७९१
अतुलकुमार खोब्रागडे-अपक्ष -१२,०६६
नितीन कराळे -अपक्ष -६,९१७
राहुल वानखेडे-वंचित बहुजन आघाडी-३,७७०
अवैध मते - ११,५६०