बदलते रूप : मेळघाटातील बांबूपासून सव्वा लाख राख्यांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 09:32 PM2019-08-06T21:32:54+5:302019-08-06T21:38:30+5:30

एकेकाळी कुपोषण आणि दारिद्रय अशी ओळख असलेल्या मेळघाटला रोजगाराचा मार्ग गवसला आहे. त्यातून मेळघाटचे रूप बदलू पाहत आहे. ते जगासमोर येणे आवश्यक आहे. येथे निर्माण होणाऱ्या बांबूपासून सव्वा लाख बांबू राख्यांची निर्मिती करण्यात आली आहे. असे प्रयोग झाले तर मेळघाटला अनुदानाच्या खिचडीची गरज पडणार नाही, असा विश्वास संपूर्ण बांबू केंद्राचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी येथे झालेल्या मीट द प्रेसमध्ये व्यक्त केला.

Variations: Production of one hundred and quarter lakh rakhis from bamboo in Melghat | बदलते रूप : मेळघाटातील बांबूपासून सव्वा लाख राख्यांची निर्मिती

बदलते रूप : मेळघाटातील बांबूपासून सव्वा लाख राख्यांची निर्मिती

Next
ठळक मुद्देरोजगारातून सन्मानासाठी बांबू केंद्राचे पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकेकाळी कुपोषण आणि दारिद्रय अशी ओळख असलेल्या मेळघाटला रोजगाराचा मार्ग गवसला आहे. त्यातून मेळघाटचे रूप बदलू पाहत आहे. ते जगासमोर येणे आवश्यक आहे. येथे निर्माण होणाऱ्या बांबूपासून सव्वा लाख बांबू राख्यांची निर्मिती करण्यात आली आहे. असे प्रयोग झाले तर मेळघाटला अनुदानाच्या खिचडीची गरज पडणार नाही, असा विश्वास संपूर्ण बांबू केंद्राचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी येथे झालेल्या मीट द प्रेसमध्ये व्यक्त केला.
देशपांडे म्हणाले, मेळघाटात ३१७ गावे आहेत. तीन लाख लोकसंख्येमध्ये एक लाख ८० हजार तरुण आहेत. 

मेळघाटच्या या युवा सामर्थ्यांचा उपयोग सकारात्मक कार्यात झाला तर काय साध्य होऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे बांबूपासून तयार झालेल्या राख्या आहेत. मेळघाटात फक्त कुपोषणच नाही. येथे दरवर्षी सहा हजार बालके जन्मास येतात. पण कुपोषणाचे शिकार होणारे फक्त ४०० असतात. उर्वारित ५,४०० बालके याच वातावरणात जगतात, तेच अन्न खातात, तरीही सक्षमपणे जगतात हे देखील लक्षात घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
रोजगारनिर्मितीसाठी बांबूपासून राख्या निर्मितीच्या  प्रयोगाबद्दल ते म्हणाले, मागील तीन वर्षांपासून या राख्या तयार होत आहेत. यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री प्रकल्पाच्या माध्यमातून मेळघाटच्या जंगलात पोहचली आहे. आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या माध्यमाने ४० देशात ही राखी पोहचली आहे. मागील वर्षी मेळघाटातील महिलांनी पंतप्रधानांच्या हातावर या राख्या बांधल्या होत्या.
बांबू धोरण सकारात्मक करण्यात मेळघाटचा मोठा वाटा असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. २०१७ मध्ये राज्य सरकारने बांबू धोरण तयार केले. १९२७ चा वनकायदा बदलला. त्याचा सकारात्मक परिणाम येथे दिसत आहे. मेळघाट आपले रूप बदलत असून, हागणदारीमुक्त गावासोबत बाथरूमयुक्त गाव ही संकल्पना चित्री या गावात साकारली आहे. आसाम, झारखंड या राज्यांसह पनवेल, किनवट, नागपूर या क्षेत्रातही कार्य सुरू झाले आहे. मेळघाटातील खामदा, किनीखेडा, कुंड, खोपमार, राक्षा ही पाच गावे सोलरयुक्त झाली आहेत. यामुळे मेळघाटची ओळख यापुढे सन्मानजनक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मेळघाटला कॉमन फॅसिलिटी सेंटरची नव्हे तर डिझाईन्स स्टुडिओंची जागोजागी गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी विभागीय माहिती कार्यालयाचे अनिल गाडेकर, संपूर्ण बांबू केंद्राचे सचिव सतीश घाणेकर, चंदा कनोजे, अनिता सेलूकर उपस्थित होते.
बांबू केंद्राने परिवर्तन घडविले : चंदा कनोजे
आपल्यासारख्या अनेकांच्या आयुष्यात बांबू केंद्राने परिवर्तन घडविल्याचे मनोगत चंदा कनोजे यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, आम्ही भीलाला समाजातील. मुलगी म्हणून जगताना समाजाची बंधने अनेक. तरीही दहावी नापास असतानाही केंद्राने सन्मानाचे काम दिले. आईवडिलांनी परवानगी दिली. आज संगणक चालविते, टॅलीचे काम करते, एवढेच नाही तर प्रकल्पाच्या कामासाठी विमान, रेल्वेने प्रवास करते. पंतप्रधानांच्या हातावर राखी बांधण्याचे सौभाग्यही आपणास मिळाले. आयुष्यातील हे परिवर्तन संपूर्ण बांबू केंद्रामुळे घडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Variations: Production of one hundred and quarter lakh rakhis from bamboo in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.