सुरक्षित रेल्वे परिचालनासाठी मध्य रेल्वेच्या विविध उपाययोजना
By नरेश डोंगरे | Published: December 20, 2023 12:43 AM2023-12-20T00:43:07+5:302023-12-20T00:43:34+5:30
एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान मध्य रेल्वेने एकूण ३० गेट केले बंद
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: अपघातमुक्त सेवा देऊन रेल्वेच्या सुरक्षित संचालनासाठी मध्य रेल्वेने गेल्या काही महिन्यांपासून अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याचा चांगला परिणाम समोर येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो आणि नंतर रेल्वे प्रशासनासोबतच प्रवाशांनाही मोठा मनस्ताप मिळतो. तो टाळण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने लेव्हल क्रॉसिंग गेट बंद करणे, रेल्वे डबे आणि शक्ती यान मध्ये धूर प्रतिबंधक उपकरणांची तरतूद करणे, आंतर-रेल्वे सुरक्षा लेखापरीक्षण करून अपघाताच्या मॉक ड्रिल घेणे आदींवर भर दिला आहे.
रोड लेव्हल क्रॉसिंग गेटमुळे नागरिकांना त्रास होतो. अपघाताची भीती असते. त्यामुळे ओव्हर किंवा अंडर ब्रीज बांधून सर्व रोड क्रॉसिंग गेट बंद करण्यात येत आहेत. एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान मध्य रेल्वेने एकूण ३० गेट बंद केले आहेत. त्यात भुसावळ विभागातील १०, नागपूर विभागातील ८, पुणे विभाग ६, मुंबई ५ आणि सोलापूर विभागातील एका गेटचा समावेश आहे. रेल्वे गाडीत आगीचा धोका रोखण्यासाठी रेल्वे गाडीचे डबे आणि शक्तियानमध्ये धूर शोधक आणि धूर शामक यंत्रणा लावली जात असून, गेल्या ८ महिन्यांत विविध रेल्वेगाड्यांच्या डब्यांमध्ये ८८ एकूण ४२० धूर शोधक यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत.
या शिवाय ब्लॉक प्रोव्हिंग एक्सल काउंटर सिस्टम, ओएचई मास्टचे क्रिटिकल इम्प्लांटेशन, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसह सिग्नलिंग गिअर्स सिस्टम कार्यान्वित करण्यात आली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर-२०२३ या कालावधीत आतापर्यंत एकूण ८२ सुरक्षा सचोटी चाचण्या घेण्यात आल्या आहेत ज्यात नागपूर विभागातील २३, सोलापूर विभागातील १७, पुणे विभागातील १० आणि मुंबई आणि भुसावळ विभागातील प्रत्येकी १६ चाचण्यांचा समावेश आहे. उत्तम सुरक्षा उपाय सुनिश्चित करण्यासाठी आणि कोणत्याही त्रुटी व पूर्वाग्रह दूर करण्यासाठी निष्पक्ष लेखापरीक्षण करण्याचा नियमित प्रयत्न असतो. यामध्ये रेल्वे बोर्डाने नामनिर्देशित केलेल्या क्षेत्रीय वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक टीम असते जी बोर्डाच्या सूचनेनुसार इतर क्षेत्रांना भेट देऊन थर्ड पार्टी सुरक्षा लेखापरीक्षण करतात. त्याचप्रमाणे अपघात झाल्यास तातडीने कोणत्या आणि कशा उपाययोजना करायच्या त्यासाठी ठिकठिकाणी अकस्मात मॉक ड्रिल घेतल्या जात आहेत.
चर्चा सत्र, शिबिरे आणि समुपदेशन
प्रवाशांना अपघातमुक्त सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षा चर्चासत्र, शिबिरे आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठकी घेऊन त्यांचे समुपदेशन केले जात आहे. या सर्व उपाययोजनांचे चांगले परिणाम दिसून येत असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.