वरवरा राव यांच्या जामीनला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:08 AM2021-03-25T04:08:25+5:302021-03-25T04:08:25+5:30
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड घातपात प्रकरणामध्ये आरोपी असलेले ज्येष्ठ कवी व विचारवंत ...
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड घातपात प्रकरणामध्ये आरोपी असलेले ज्येष्ठ कवी व विचारवंत डॉ. पी.व्ही. वरवरा राव (८१) यांचा अंतरिम जामीन येत्या ३१ मार्चपर्यंत वाढवून दिला. प्रकरणावर न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
न्यायालयाने गेल्या २३ फेब्रुवारी रोजी राव यांना चार आठवड्यासाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. तसेच, राज्य सरकारला नोटीस बजावून राव यांच्या जामीन अर्जावर उत्तर सादर करण्यास सांगितले होते. दरम्यान, चार आठवडे पूर्ण झाल्यामुळे अंतरिम जामिनाची मुदत वाढवून घेण्यासाठी हे प्रकरण न्यायालयासमक्ष ठेवण्यात आले होते. सुनावणीच्या वेळी न्यायालयाने सरकारला उत्तराविषयी विचारले असता सरकारने याकरिता वेळ देण्याची विनंती केली. परिणामी, न्यायालयाने प्रकरणावर येत्या ३१ मार्च रोजी पुढील सुनावणी निश्चित केली व राव यांना तेव्हापर्यंत अंतरिम जामीन वाढवून दिला.
२३ डिसेंबर २०१६ रोजी नक्षलवाद्यांनी सूरजागड लोह खदान परिसरात कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह एकूण ८० वाहने जाळली होती. तसेच, वाहन चालक, त्यांचे सहायक व मजुरांना काठ्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यांना अंगावर डिझेल टाकून जाळून ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. अश्लील शिवीगाळ करण्यात आली होती. या प्रकरणात ट्रक चालक राजबिंदरसिंग शेरगील यांच्या तक्रारीवरून एटापल्ली पोलिसांनी २७ डिसेंबर २०१६ रोजी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०७, ३४१, ३४२, ४३५, ३२३, ५०४, १४३, १४७, १४९, १२०-ब यासह विविध कलमांतर्गत एफआयआर नोंदवला. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात राव यांचा या घटनेशी संबंध आढळून आल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. ८ जून २०२० रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने राव यांना या गुन्ह्यात जामीन देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. रावतर्फे ॲड. बरुण कुमार तर, सरकारतर्फे ॲड. एस.एम. उके यांनी कामकाज पाहिले.