आरोपी जास्त असल्यामुळे लांबतोय वासनकर खटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:08 AM2021-05-10T04:08:01+5:302021-05-10T04:08:01+5:30

नागपूर : आरोपी जास्त असल्यामुळे वासनकर गुंतवणूकदार फसवणूक खटला लांबत असल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ...

Vasankar case is pending as there are more accused | आरोपी जास्त असल्यामुळे लांबतोय वासनकर खटला

आरोपी जास्त असल्यामुळे लांबतोय वासनकर खटला

Next

नागपूर : आरोपी जास्त असल्यामुळे वासनकर गुंतवणूकदार फसवणूक खटला लांबत असल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे़ यासंदर्भात उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे़

राज्य सरकारने खटला लांबण्याची विविध करणे दिली आहेत, पण मुख्य कारण आरोपींची संख्या असल्याचे नमूद केले आहे़ या प्रकरणात एकूण २७ आरोपी असून त्यांची बाजू मांडण्यासाठी वेगवेगळे वकील सत्र न्यायालयात येतात़ साक्षीदारांच्या सरतपासणीनंतर आरोपींचे वकील स्वत:च्या सुविधेनुसार त्यांची उलटतपासणी घेतात़ त्यामुळे एक साक्षीदाराचे बयान नोंदविण्यासाठी ८ ते १० दिवस लागतात़ परिणामी, खटला लांबत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे़ याशिवाय, कोरोना संक्रमण, आरोपींनी विविध कारणांनी विविध न्यायालयांमध्ये दाखल केलेली प्रकरणे, हजारो पानांचा रेकॉर्ड, वयोवृध्द साक्षीदार, साक्षीदारांचे विविध कारणांमुळे न्यायालयात उपस्थित राहणे अशक्य होणे व साक्षीदारांचे नागपूर सोडून दुसऱ्या शहरात स्थलांतरण या बाबीही खटला लांबण्यास कारणीभूत ठरत असल्याचे सरकारने न्यायालयाला सांगितले आहे़

----------

हे आहेत आरोपी

प्रकरणातील आरोपींमध्ये प्रशांत जयदेव वासनकर, विनय जयदेव वासनकर, अभिजित जयंत चौधरी, मिथिला विनय वासनकर, सुजित सी़ मजुमदार, सारिका रुकेश चाकुंडे, भाग्यश्री प्रशांत वासनकर, कुमुद जयंत चौधरी, मीनाक्षी सचिन कोवे, श्रीनिवासन रामकुमार अय्यर, वैशाली श्रीनिवासन अय्यर, पराग रमन हेंगेकर, रामकुमार सुब्रमण्यम अय्यर, तनुजा सत्यजित धर्माधिकारी, पायल किशनसिंग बिंद्रा, राजेश भय्यालाल तुरकर, कौस्तुभ किशोर शास्त्री, नीतेश वसंत धावडा, वैशाली रमेश मोटधरे, चंद्रकांत आऱ राय, हेमंत रामभाऊ कामडी, सरला जयदेव वासनकर, दीप्ती पत्की व मनोज पांडे यांच्यासह वासनकर वेल्थ मॅनेजमेंट, सरला सेक्युरिटीज व वासनकर इन्व्हेस्टमेंट या कंपन्यांचा समावेश आहे़ दीप्ती पत्की व मनोज पांडे हे दोन आरोपी फरार आहेत़

---------------------

१२८ कोटी रुपयांचा घोटाळा

वासनकर समूहाच्या योजनांमध्ये ८५८ गुंतवणूकदारांनी १२७ कोटी ८२ लाख ७८ हजार ६४१ रुपयांची गुंतवणूक केली होती़ ही रक्कम त्यांना परत मिळाली नाही़ ही रक्कम आता व्याजासह २३६ कोटी ३३ लाख १ हजार ८६४ रुपये झाली आहे़ पोलिसांनी या प्रकरणात २४ सप्टेंबर २०१४ रोजी मुख्य आरोपपत्र दाखल केले़ त्यानंतर १६ ऑक्टोबर २०१४, १६ जुलै २०१५, १० ऑगस्ट २०१६, ९ ऑक्टोबर २०१७ व १८ जुलै २०१९ रोजी पुरवणी आरोपपत्रे दाखल करण्यात आली़ पोलिसांनी ९ मे २०१४ रोजी विवेक पाठक यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुध्द एफआयआर नोंदविला होता़

--------------------

खटला निकाली काढण्यासाठी मुदतवाढ

कोरोना संक्रमणामुळे सत्र न्यायालयात गेल्या एक वर्षापासून नियमित कामकाज झाले नाही़ परिणामी, उच्च न्यायालयाने हा खटला निकाली काढण्यासाठी ४ मार्च २०२१ रोजी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली़ हा खटला आता सप्टेंबर-२०२१ पर्यंत निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत़ सुरुवातीला २३ एप्रिल २०१९ रोजी न्यायालयाने हा खटला ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत निकाली काढण्याचा आदेश दिला होता़ त्यानंतर ही मुदत ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवून देण्यात आली होती़

Web Title: Vasankar case is pending as there are more accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.