वसंत चिंचाळकरांचे साहित्य मराठीला सुंदर वळण देणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:08 AM2021-01-23T04:08:29+5:302021-01-23T04:08:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वसंत चिंचाळकर यांनी कथा, प्रवासवर्णने, निबंध, ललित यातून वाचकांवर वेगळी छाप सोडली आहे. त्यांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वसंत चिंचाळकर यांनी कथा, प्रवासवर्णने, निबंध, ललित यातून वाचकांवर वेगळी छाप सोडली आहे. त्यांचे लेखन मराठी साहित्याला सुंदर वळण देणारे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वि. स. जोग यांनी केले.
ज्येष्ठ लेखक वसंत चिंचाळकर यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा रविवारी पार पाडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लोकमतचे संपादक-समन्वयक कमलाकर धारप होते. ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, डॉ. संजय शेंडे प्रमुख पाहुणे होते.
या प्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते मानपत्र देऊन चिंचाळकर यांचा सत्कार करण्यात आला. ‘अभिवादन’ ही स्मरणिकाही प्रकाशित करण्यात आली.
कमलाकर धारप म्हणाले, वसंत चिंचाळकर मागील तीस ते चाळीस वर्षांपासून कथालेखन करीत असून मानवी भावभावनांचा शोध घेणारी त्यांची लेखणी वाचकांना परिचित आहे. त्यांच्या कथेने मराठी कथाविश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. डॉ. संजय शेंडे म्हणाले, चिंचाळकरांचे साहित्य हे जातीविहीन समाजरचनेचा पुरस्कार करणारे आणि सत्यशोधकी आहे. समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या मानवी हक्काचा पुरस्कार करणाऱ्या त्रयींचा सन्मान करणारे आहे. श्रीपाद अपराजित यांनीही मनोगत व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना वसंत चिंचाळकर म्हणाले, आजपर्यंत सत्यनिष्ठा जोपासतच आपण जीवन घालविले आहे यापुढे आपला तोच मार्ग असेल.
कार्यक्रमादरम्यान लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, ज्येष्ठ पत्रकार आनंद अंतरकर यांच्या शुभसंदेशांचे वाचन प्रदीप शेंडे यांनी केले. अमृता अंबुलकर यांनी प्रास्ताविक केले. संचालन कवयित्री मीनल येवले यांनी, तर आभार आदित्य व श्रद्धा चिंचाळकर यांनी मानले.