‘वसंतोत्सवी’ उधळली शब्दसुरांची माळफुले

By admin | Published: January 11, 2015 12:51 AM2015-01-11T00:51:01+5:302015-01-11T00:51:01+5:30

हिरव्याकंच रानवाटेने निघालेल्या एका काफिल्याला पुढच्याच वळणावर बहरलेल्या प्राजक्ताचा गंध यावा, ही फुले नक्की कुठे उमललीत याचा शोध सुरू व्हावा अन् कुठूनतरी अचानक पुढे आलेल्या

'Vasantotsav' wasted words | ‘वसंतोत्सवी’ उधळली शब्दसुरांची माळफुले

‘वसंतोत्सवी’ उधळली शब्दसुरांची माळफुले

Next

स्वरवेधचे आयोजन : सुखद स्वरानुभवाने नागपूरकर मंत्रमुग्ध
नागपूर : हिरव्याकंच रानवाटेने निघालेल्या एका काफिल्याला पुढच्याच वळणावर बहरलेल्या प्राजक्ताचा गंध यावा, ही फुले नक्की कुठे उमललीत याचा शोध सुरू व्हावा अन् कुठूनतरी अचानक पुढे आलेल्या नवतरुणाने त्याच्या ओंजळीतील प्राजक्तफुले त्या काफिल्यापुढे रिती करावी, असाच काहीसा अनुभव आज डॉ़ वसंतराव देशपांडे सभागृहात उपस्थितांनी घेतला़ यातील काफिला श्रोत्यांचा होता, प्राजक्त सुरांचा अन् ज्यांनी ती गंधीत ओंजळ रिती केली तो नवतरुण होता खुद्द वसंतरावांचा नातू राहुल देशपांडे़ निमित्त होते पहिल्यांदाच मुंबई-पुण्याबाहेर झालेल्या व स्वरवेधने आयोजित केलेल्या ‘वसंतोत्सव’चे़
सध्याच्या युवा पिढीमध्ये एक अग्रणी आणि शास्त्रीय संगीतातील कसलेले कलाकार म्हणून राहुल देशपांडे यांना अवघा महाराष्ट्र ओळखतो़ आपल्या आजोबांच्या म्हणजे डॉ़ वसंतराव देशपांडेंच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी वसंतोत्सवाची सुरुवात केली आणि आज नागपूरकर श्रोत्यांनाही या उत्सव पालखीचे भोई होता आले़ १० व ११ जानेवारी अशा दोन दिवसीय या महोत्सवात आज पहिल्या दिवशी ‘राहुल हटके’ हा अत्यंत श्रवणीय कार्यक्रम सादर झाला़ मैफिल शास्त्रीय संगीताची आणि ‘राहुल हटके’ असे शीर्षक कसे, असा प्रश्न आधी श्रोत्यांना पडला खरा पण, राहुल यांचा हा शब्दकाफिला पुढे निघाला अन् श्रोत्यांना हटके या शब्दाचा अर्थ गवसत गेला़ गणिताच्या दृष्टिकोनातून जसे २४ संयोग शक्य आहेत तसेच संगीताचेही आहे़ वेगवेगळे स्वरसमूह घेऊन त्यातील असेच संयोग राहुल यांनी एकत्र केले आणि प्रत्येक राग असा कापसासारखा पिंजून पिंजून त्याची जणू सुंदर, मऊ, मखमली गादीच तयार झाली़ तू सुखकर्ता, तू दुखहर्ता.... या गणेश वंदनेने सुरू झालेली ही मैफिल पुढे तब्बल तीन तास संगीतातील विविध संयोगांनी गाजत व वाजत राहिली़ यात कधी मत्स्यगंधातील देवाघरचे ज्ञात कुणाला, हे भावस्पर्शी नाट्यपद होते तर कधी, तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी हे प्रणयगीतही होते़ कुमार गंधर्वांच्या स्वर्गीय आवाजातील आज अचानक गाठ पडे...ची प्रेमळ तरलता होती तर त्याचवेळी दयाघना तुटले चिमणे घरटेची आर्त सादही होती़
बाहेर कडाक्याची थंडी अन् आत अशी शब्दांची ऊब देणारा वसंतोत्सव अन् भरात आला आणि राहुल देशपांडेंनी मेडलीला हात घातला. कुणी जाल का सांगाल का, राहिले ओठांत या, वाटेवर काटे वेचित चाललो या तिन्ही गीतांचे एकएक कडवे एकामागून एक सादर झाले अन् तुडुंब भरलेल्या सभागृहात टाळ्यांच्या रूपात एकमुखी प्रतिसाद दिला़ या संपूर्ण कार्यक्रमात राहुल यांना सचिन बक्षी, अ‍ॅड़ भानुुदास कुळकर्णी, श्रीकांत पिसे, शिरीष भालेराव, महेंद्र ढोले, अरविंद उपाध्ये आणि नंदू गोहणे यांची सुरेल साथसंगत लाभली़ निवेदन मुकुंद देशपांडे यांनी केले़
नागपुरातला वसंतोत्सव चिरतरुण राहील - सिरपूरकर
नागपुरात पहिल्यांदा झालेल्या वसंतोत्सवाला रसिकाश्रय मिळाला आहे़ गच्च भरलेले सभागृह हा त्याचाच पुरावा आहे़ म्हणूनच वसंत ऋतू जसा तरुण असतो तसाच वसंतोत्सवही नागपुरात सदैव चिरतरुणच राहील, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी गौरव केला़ ते उद्घाटनीय सत्राच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते़ कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले़ प्रमुख अतिथी म्हणून राहुल देशपांडे यांचे वडील विजयराव देशपांडे व एसएनडीएलचे व्यवसाय प्रमुख सोनल खुराणा उपस्थित होते़ यावेळी नाट्य व संगीत क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणारे अप्पासाहेब इंदूरकर, डॉ़ राम म्हैसाळकर व सूरमणी पंडित प्रभाकरराव धाकडे यांचा सत्कार करण्यात आला़ विदेशात तबल्याचे सुंदर सादरीकरण करणाऱ्या अथर्व शेष याचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला़ संचालन रेणुका देशकर यांनी केले़ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही सपत्नीक कार्यक्रमाला आले व त्यांनीही या सुंदर मैफिलीचा आस्वाद घेतला़ उद्या रविवारी सकाळी ९ वाजता वसंतोत्सवात कट्यार काळजात घुसली या नाटकाचा प्रयोग होणार असून संध्याकाळी ६.३० वाजता राहुल देशपांडे व प्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकर यांची स्वरा ही खास जुगलबंदी रंगणार आहे़

Web Title: 'Vasantotsav' wasted words

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.