वसंतराव देशपांडे संगीत महोत्सव ३० पासून
By Admin | Published: July 24, 2014 01:01 AM2014-07-24T01:01:04+5:302014-07-24T01:01:04+5:30
शास्त्रीय संगीताची मेजवानी देणाऱ्या डॉ. वसंतराव देशपांडे संगीत महोत्सवाला येत्या ३० जुलैपासून सुरुवात होणार आहे. या महोत्सवाचे आयोजन दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
नागपूर : शास्त्रीय संगीताची मेजवानी देणाऱ्या डॉ. वसंतराव देशपांडे संगीत महोत्सवाला येत्या ३० जुलैपासून सुरुवात होणार आहे. या महोत्सवाचे आयोजन दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे करण्यात आले आहे. प्रख्यात शास्त्रिय गायिका बेगम परवीन सुलताना या महोत्सवाचे विशेष आकर्षण राहणार आहे. महोत्सवाचे यंदाचे २२ वे वर्ष आहे.
सिव्हिल लाईन येथील देशपांडे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ३०, ३१ जुलै आणि १ आॅगस्ट असे तीन दिवस कार्यक्रम होणार आहे. यात हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, तबला-पखवाज जुगलबंदी, कर्नाटक शैलीत व्हायोलिन जुगलबंदी तसेच ध्रुपद गायन होणार आहे. पहिल्या दिवशी उद्घाटनानंतर पं. रोणू मुजुमदार यांचे बासरी वादन आणि बी. जयश्री यांच्या कर्नाटकी शैलीच्या गायनाची जुगलबंदी होईल. त्याचबरोबर पं. राजन साजन मिश्रा यांच्या हिंदुस्थानी गायनाचा आस्वाद रसिकांना घेता येईल. ३१ जुलैला गुंदेचा बंधूंच्या ध्रुपद गायनाने मैफल सुरू होईल.
पं. विजय घाटे यांचे तबलावादन व पं. भवानी शंकर यांच्या पखवाज वादनाची जुगलबंदी होईल. १ आॅगस्टला गणेश आणि कुमरेश यांची कर्नाटकी शैलीतील व्हायोलिन वादनाची जुगलबंदी होणार आहे. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाने महोत्सवाचा समारोप होईल. २३ जुलै ते २६ जुलै दरम्यान प्रवेशपत्रिका उपलब्ध राहणार आहे. महोत्सवाच्या निमित्त यावर्षी पहिल्यांदाच डॉ. वसंतराव देशपांडे युवा संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार २७ जुलैपासून २९ जुलैपर्यंत ही स्पर्धा होईल. यात हिंदुस्थानी तसेच कर्नाटकी शैलीचे युवा गायक आणि वादक सहभागी होतील. विजेत्यांना महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. (प्रतिनिधी)