वसतिगृह असावे तर असे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:41 AM2017-07-31T00:41:34+5:302017-07-31T00:43:00+5:30
विस्तीर्ण परिसर, भव्य शासकीय इमारत, सुंदर व तितक्याच स्वच्छ खोल्या आणि अधिकारी-कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये असलेले....
सुमेध वाघमारे/ आनंद डेकाटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विस्तीर्ण परिसर, भव्य शासकीय इमारत, सुंदर व तितक्याच स्वच्छ खोल्या आणि अधिकारी-कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये असलेले विश्वासाचे अतूट नाते म्हणजे वानाडोंगरी हिंगणा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह.
होय कुणाला विश्वास बसणार नाही, परंतु शासकीय वसतिगृह सुद्धा इतके सुंदर राहू शकते, याचे हे मूर्तिमंत उदाहरण असून या वसतिगृहाने केवळ नागपूरसाठीच नव्हे तर संबंध राज्यासाठी एक आदर्श घालून दिला आहे.
सामाजिक न्याय विभागांतर्गत तालुका व जिल्हा स्तरावर शासकीय वसतिगृह मंजूर करण्यात आले. त्यापैकीच एक वसतिगृह वानाडोंगरी हिंगणा येथे सुद्धा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह असे याचे नाव असून २०११-१२ या शैक्षणिक वर्षात ते सुरू झाले. या वसतिगृहाला १०० विद्यार्थ्यांची मान्यता असून तितक्याच विद्यार्थ्यांची क्षमतासुद्धा आहे. जवळपास सात एकर परिसरात हे वसतिगृह पसरले आहे. दोन माळ्याची ही विस्तीर्ण व सुंदर इमारत आहे. प्रत्येक माळवर १५ खोल्या आहेत. एका खोलीत चार विद्यार्थी राहतात. प्रत्येकाला स्वतंत्र बेड व अभ्यासासाठी स्वतंत्र टेबल खुर्चीची व्यवस्था आहे. येथे आठव्या वर्गापासून दर पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना चांगल्या सोईसुविधा उपलब्ध होत असल्याने त्यांनी आपली गुणवत्ताही कायम राखली आहे, हे विशेष.
प्रत्येक खोलीबाहेर डस्टबीन
वसतिगृहात स्वच्छता काम राहावी, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या खोलीबाहेर एक डस्टबीन ठेवण्यात आलेली आहे. विद्यार्थी सुद्धा खोली स्वच्छ ठेवून कचरा बाहेर डस्टबीनमध्ये टाकतात. त्यामुळे खोली व पोर्च स्वच्छ राहतात.
व्यवस्थापनात विद्यार्थ्यांचा सहभाग
वसतिगृहात विद्यार्थ्यांनाच राहायचे आहे. त्यामुळे येथील सर्व कारभार हा गृहपाल पाहत असले तरी त्यात विद्यार्थ्यांचाही सहभाग असावा, या उद्देशातून वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या विविध समिती तयार करण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ आहार समिती, सांस्कृतिक समिती. या समितीत विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी असतात. तेच यासंबंधीचा निर्णय घेत असतात. त्यामुळे आहार आणि इतर दुसºया कुठल्याही गोष्टींसाठी तक्रारीची शक्यताही नसते. अशीच पद्धत इतर वसतिगृहांमध्ये राबवण्याच्या सूचनाही वरिष्ठ अधिकाºयांनी दिलेल्या आहेत.
वृक्षारोपणातून फुलला परिसर
विस्तीर्ण परिसरात पसरलेले हे वसतिगृह पूर्वी ओसाड होते. परंतु वृक्षप्रेमी गृहपालामुळे याचे रुप पालटले आहे. गृहापालांनी पुढाकार घेऊन परिसरात वृक्षारोपणास सुरुवात केली. विद्यार्थ्यांनाही याची आवड निर्माण झाली. जो कुणी विद्यार्थी वसतिगृह सोडून जाईल. तो आठवण म्हणून एक वृक्ष लावेल, असा अलिखित नियम तयार झाला. यातून हा संपूर्ण परिसर आज वृक्षवेलींनी फुलून गेला आहे.
सुसज्ज ग्रंथालय व व्यायामशाळा
वसतिगृहातील ग्रंथालय सुसज्ज आहे. प्रत्येक पुस्तक वसतिगृहात उपलब्ध आहे. टेबल खुर्च्यांची चांगली सुविधा आहे. तसेच बुद्धीला चालना दिल्यानंतर शारीरिक व्यायामासाठीहीच व्यवस्था सुसज्ज अशी आहे. वसतिगृहात स्वतंत्र जीम आहे. त्यात सर्व साहित्य नवीन बसवण्यात आलेले आहेत.
जून महिन्याचा निर्वाह भत्ता अदा
सोईसुविधंसोबतच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्यांचा निर्वाह भत्ता सुद्धा वेळेवर उपलब्ध होतो. जून महिन्याचा निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांना अदा झालेला आहे. तसेच मेसचे भाडे सुद्धा व्यवस्थित मिळाल्याचेही सांगितले जाते.
विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी
विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे, याकडे विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. यासाठी पंप हाऊसमधूनच पाणी शुद्ध केले जाईल, अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे
वसतिगृहात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. गृहप्रमुख आपल्या कार्यालयात बसून या सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण वसतिगृह व परिसरावर लक्ष ठेवतात.
इन्व्हर्टरची सुविधा
अचानक लाईट गेल्यास इन्हर्टरची सुविधा सुद्धा येथे उपलब्ध आहे. भोजनकक्ष व ग्रंथालयात विशेषत्वाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
बायोमेट्रिक हजेरी
वसतिगृहात अधिकारी-कर्मचाºयासह विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बायोमेट्रिक हजेरी सिस्टीम लावण्यात आली आहे. यातून विद्यार्थी व कर्मचाºयांमध्ये एक शिस्त निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांसाठी गरम पाणी
विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. प्रत्येक पोर्चवर दोन नळ लावण्यात आले आहे. ज्यांना गरम पाणी हवे असेल त्यांनी बाहेर येऊन बादली भरून न्यावे, अशी ही व्यवस्था आहे. यासोबतच परिसरात सोलर पथदिवे सुद्धा लावण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांची ई-बँक
येथे येणारे विद्यार्थी हे मागासवर्गीय आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. एखाद्या विद्यार्थ्याला पैशाची गरज पडलीच तर अडचण होते. यातून विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन ई-बँक सुरू केली आहे. याअंतर्गत येणारा प्रत्येक विद्यार्थी १०० रुपये जमा करतो. यातून गरजू विद्यार्थ्याला बिनव्याजी पैसे उपलब्ध करून दिले जातात.
ज्यानी दिली भेट तो पडला प्रेमात
या वसतिगृहाला आजवर अनेक अधिकाºयांनी भेटी दिल्या. यात सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष सी.एस. थूल याचा समावेश आहे. या मान्यवरांनी वसतिगृहाबाबत येथील व्हीजिट बुकमध्ये नोंदविलेल्या भावना बोलक्या आहेत. यात शासकीय वसतिगृह असेही असू शकते, यावर आपला विश्वासच बसत नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. तसेच येथे राबविण्यात येणाºया गोष्टी इतर वसतिगृहातही राबविण्यात याव्यात, अशा सूचनाही दिलेल्या आहेत. यामुळेच येथील गृहपालांना आदर्श गृहपालाच्या सन्मानाने सुद्धा पुरस्कृत करण्यात आलेले आहे.