वासुदेवराव चोरघडे ज्ञानाचा महाकोश : पंकज चांदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 01:05 AM2018-12-09T01:05:23+5:302018-12-09T01:07:41+5:30
वासुदेवराव चोरघडे संस्कृतचे चालतेबोलते विद्यापीठ होते. प्रचंड ज्ञान आणि अभ्यास असूनही ते सामान्य माणसात मिसळायचे. प्रामाणिकता हीच माझी संपत्ती असल्याचे त्यांचे विचार होते असे सांगून ते ज्ञानाचा महाकोश होते, असे प्रतिपादन कवि कुलगुरु कालिदास विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. पंकज चांदे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वासुदेवराव चोरघडे संस्कृतचे चालतेबोलते विद्यापीठ होते. प्रचंड ज्ञान आणि अभ्यास असूनही ते सामान्य माणसात मिसळायचे. प्रामाणिकता हीच माझी संपत्ती असल्याचे त्यांचे विचार होते असे सांगून ते ज्ञानाचा महाकोश होते, असे प्रतिपादन कवि कुलगुरु कालिदास विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. पंकज चांदे यांनी केले.
विदर्भातील २३ संस्थांच्यावतीने ज्ञानसाधू वासुदेवराव चोरघडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रामनगर येथील शक्तिपीठात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर विजय पोफळी महाराज, दत्ता महाराज, वासुदेवरावांचे पुत्र अभय चोरघडे उपस्थित होते. डॉ. चांदे म्हणाले, वासुदेवराव चांगले कलावंतही होते. सर्वांनाच सोबत घेणारे हे व्यक्तिमत्त्व आज आपल्यात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पोफळी महाराज यांनी वासुदेवरावांनी अखेरपर्यंत कर्म केल्याचे सांगितले. दत्ता महाराज यांनी वासुदेवरावांनी दिलेला ज्ञानस्रोत कधी संपू शकत नसल्याचे मत व्यक्त केले. मोहनबुवा कुबेर म्हणाले, चांगले असेल ते कीर्तनात यावे पण त्याचे मूळ स्वरूप हरवू नये हा वासुदेवरावांचा विचार महत्त्वाचा आहे. रमेश बक्षी यांनी नूतन भारत विद्यालयाच्या छात्रावासाला वासुदेवरावांचे नाव देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती दिली. यावेळी आशुतोष शेवाळकर, राजेश पाणूरकर, प्रसाद फडणवीस, बाळासाहेब हळदे, प्रसन्न मुजुमदार, प्रकाश घुडे, दीपक देशपांडे, राजाभाऊ गुंजीकर, डॉ. विजयकुमार, चंद्रगुप्त वर्णेकर, श्रीनिवास वर्णेकर, सुरेश बल्लाळ, ममता गद्रे, अरुण देशपांडे, डॉ. अंजली भांडारकर, वामन जोशी यांनी वासुदेवरावांना श्रद्धांजली अर्पण केली. संचालन कृष्णशास्त्री आर्वीकर यांनी केले.