लोकमत परिवाराच्या शुभेच्छांनी भारावले वीरा साथीदार
By admin | Published: September 25, 2015 03:33 AM2015-09-25T03:33:41+5:302015-09-25T03:33:41+5:30
‘आॅस्कर’साठी नामांकन झालेल्या ‘कोर्ट’ चित्रपटातील मुख्य अभिनेते वीरा साथीदार यांचे ‘लोकमत भवन’ येथे अभिनंदन करताना लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्र्डाचे चेअरमन व खासदार विजय दर्डा.
‘कोर्ट’ ला आॅस्कर मिळणारच
‘आॅस्कर’साठी नामांकन झालेल्या ‘कोर्ट’ चित्रपटातील मुख्य अभिनेते वीरा साथीदार यांचे ‘लोकमत भवन’ येथे अभिनंदन करताना लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्र्डाचे चेअरमन व खासदार विजय दर्डा.
नागपूर : महाराष्ट्राला उच्चकोटीची परंपरा लाभली आहे. येथील महान संतांनी समाजजीवन समृद्ध केले. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातही या राज्याने नवे मानदंड निर्माण केले. अलीकडच्या काही वर्षांत मराठी सिनेमासुद्धा जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करीत आहेत. ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाचे आॅस्कर पुरस्कारासाठी नामांकन होणे हा मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी बहुमानाचा क्षण आहे. ‘कोर्ट’ला ‘आॅस्कर’ मिळणारच, असा विश्वास लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केला.
‘आॅस्कर’ पुरस्कारासाठी नामांकन झालेल्या ‘कोर्ट’ या चित्रपटातील मुख्य अभिनेते वीरा साथीदार यांनी गुरुवारी ‘लोकमत भवन’ला सदिच्छा भेट दिली. यावेळी खा. दर्डा यांनी साथीदार यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले, तसेच या चित्रपटाच्या टीमला आॅस्करसाठी लोकमत परिवारातर्फे शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांनी वीरा साथीदार अक्षरश: भारावून गेले होते.
दर्डा पुढे म्हणाले, मराठी चित्रपटांना प्राधान्य मिळावे, ही लोकमतची पूर्वीपासून भूमिका राहिली आहे. यातूनच ‘लोकमत एन्टरटेनमेंट’ने २०१० मध्ये ‘जेता’ हा मराठी चित्रपट निर्माण केला होता. या चित्रपटाचा नायक नागपुरातील सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, ही नागपूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे गौरवोद्गार खा. दर्डा यांनी यावेळी काढले. (प्रतिनिधी)