भाज्या कडाडल्या; वांगी १०० तर कांदे ४० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 10:49 AM2019-08-24T10:49:46+5:302019-08-24T10:52:41+5:30

नागपुरात भाज्यांची आवक पूर्णत: अन्य राज्य आणि महाराष्ट्रातील अन्य शहरांवर अवलंबून आहे. पण या भागातूनही आवक कमी आहे. किरकोळ बाजारात वांगी १०० वर तर कांदे ४० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

Vegetable prices are high | भाज्या कडाडल्या; वांगी १०० तर कांदे ४० पार

भाज्या कडाडल्या; वांगी १०० तर कांदे ४० पार

Next
ठळक मुद्देआवक कमी झाल्याने गृहिणींचे बजेट बिघडले

रियाज अहमद।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या १५ दिवसापासून भाज्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. किरकोळ बाजारात सर्वाधिक भाव आहेत. आवक कमी झाल्यामुळे ठोक बाजारात सर्वच भाज्या महाग आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारातही भाव वधारले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक आर्थिक संकटात आहे. किरकोळ बाजारात वांगी १०० वर तर कांदे ४० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
नागपुरात भाज्यांची आवक पूर्णत: अन्य राज्य आणि महाराष्ट्रातील अन्य शहरांवर अवलंबून आहे. पण या भागातूनही आवक कमी आहे. भाज्यांचे अडतिये आणि किरकोळ विके्रत्यांनुसार १५ दिवसापासून भाज्यांची आवक कमी झाली आहेत. किरकोळ बाजारात वांगे प्रति किलो ८० ते १०० रुपये आहेत. हे भाव १५ दिवसांपूर्वी ३० ते ४० रुपये होते. कांद्याचे भाव १५ ते २० रुपयांवरून ३५ ते ४० रुपयांवर, बिन्स शेंगा ८० वरून १६० ते २०० रुपये, गवार शेंग ५० वरून ८० रुपये, पालक २० रुपयांवरून १०० ते १२० रुपये, पत्ताकोबी ३० वरून ४० ते ५० रुपये तर लसणचे भाव ५० ते ६० रुपयांवरून १२० रुपये, मेथी ४० ते ५० वरून १०० ते १२० रुपये आणि बीटचे भाव ४० रुपयांवरून दुपटीवर अर्थात ८० रुपयांवर पोहोचले आहेत. आल्याच्या भावात तिप्पट वाढ झाली असून भाव ८० ते १०० वरून २०० रुपयांपर्यंत पोहेचले आहेत. किरकोळमध्ये कोथिंबीर, टोमॅटो, हिरवी मिरची, भेंडी, शिमला मिरची आदींची आवक वाढल्यामुळे भाव कमी झाले आहेत. गुरुवारी किरकोळ बाजारात वांगे ८० ते १०० रुपये किलो, कांदे ३५ ते ४०, फूलकोबी ८० ते १००, पत्ताकोबी ४० ते ५०, आले १९० ते २००, लसूण १२०, बिन्स शेंगा १६० ते २००, गवार शेंग ८०, बीट ८०, पालक भाजी १०० ते १२०, मेथी १०० ते १२० रुपये भाव होते.

चवळी शेंगचे भाव कमी
२० दिवसांपूर्वी किरकोळ आवक कमी झाल्यानंतर बाजारात चवळी शेंगाचे भाव १२० रुपये किलोपर्यंत वधारले होते. पण पाऊस थांबल्यानंतर आवक वाढली. त्यामुळे किरकोळ बाजारात ५० रुपये किलो आहे.

आले व लसूणची आवक कमी
सध्या किरकोळ बाजारात आले १८० ते २०० रुपये प्रति किलो भाव आहेत. १५ दिवसापूर्वी भाव ८० ते १०० रुपये होते. आवक बेंगळुरू आणि छिंदवाडा येथून होते. पण सध्या बेंगळुरू येथून आवक आहे. पण आवक कमी असल्यामुळे भाव वाढले आहेत. लसूण राजस्थानातून येतो. पण तेथूनही आवक कमी आहे.

बाहेरून आवक कमी
पावसामुळे नागपूरलगतच्या भागातून आवक बंद झाली. केवळ एक वा दोन टक्के शेतकऱ्यांकडून भाज्यांची आवक आहे. अन्य शेतकरी शेतीच्या कामात गर्क आहेत. त्यामुळे भाज्यांची आवक कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेशसह नाशिक, औरंगाबाद, धुळे, यवतमाळ, संगमनेर, जळगांव आदी शहरांवर अवलंबून आहे. ही राज्ये आणि शहरामध्ये पावसाळ्यातही उत्पादने चांंगले आहे. उत्पादक नागपूरसह अन्य राज्यातही भाज्या विक्रीसाठी नेतात. त्यामुळे नागपुरात पुरेशी आवक नाही. याच कारणामुळे भाव वधारले आहे.

आॅक्टोबरनंतर होणार भाव कमी
भाज्यांची आवक अन्य शहरांवर अवलंबून आहे. पण अन्य शहरांतूनही भाज्या कमी असल्यामुळे भाव वाढले आहे. आॅक्टोबरनंतर नागपूरलगतच्या भागातून आवक सुरू होईल. त्यानंतर भाव कमी होण्याची शक्यता आहे. अन्य शहरांतून आवक वाढल्यानंतरही भाव कमी होत नाहीत.
- राम महाजन, सचिव, महात्मा फुले सब्जी फ्रूट अडतिया असोसिएशन.

नवीन उत्पादनाअभावी कांदे महाग
नवीन उत्पादनाअभावी किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ३५ ते ४० रुपयांवर पोहोचले आहे. बाजारात जुने कांदे विक्रीस आहे. जानेवारीनंतरच नवे उत्पादन बाजारात येईल.

Web Title: Vegetable prices are high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.