नागपुरात आठवड्यात उतरले भाज्यांचे भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 08:00 PM2020-10-10T20:00:10+5:302020-10-10T20:02:01+5:30
Vegetable prices down, Nagpur News गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या भाज्यांची आवक वाढल्याने भाव उतरले आहेत. पण किरकोळमध्ये भाज्या ४० ते ५० रुपये किलोदरम्यान असून गेल्या आठवड्यात भाव ६० ते ८० रुपयांपर्यंत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या भाज्यांची आवक वाढल्याने भाव उतरले आहेत. पण किरकोळमध्ये भाज्या ४० ते ५० रुपये किलोदरम्यान असून गेल्या आठवड्यात भाव ६० ते ८० रुपयांपर्यंत होते. सध्या मिरची ६० तर कोथिंबीर १०० ते १२० रुपये किलो आहे. गेल्या आठवड्यात पालक भाजीचे भाव ६० ते ८० रुपयांपर्यंत पोहोचले होते. सध्या ३० रुपयांपर्यंत उतरले आहेत. वांगे, फूलकोबी, पत्ताकोबीचे भाव आटोक्यात आहेत. स्वयंपाकघरात कमी किमतीच्या भाज्यांची रेलचेल दिसून येत आहेत.
फूलकोबी काही प्रमाणात औरंगाबाद आणि स्थानिक शेतकऱ्यांकडून येत आहे. पावसामुळे कोथिंबीर शेतातच खराब झाल्याने अजूनही आवक फार कमी आहे. त्यामुळे भाव १०० ते १२० रुपयांदरम्यान आहे. सध्या लातूर, बुलडाणा, नांदेड येथून कोथिंबीर तर लवकी भिलई, राजनांदगाव येथून येत आहे. गेल्या महिन्यात शेतकऱ्यांनी भाज्यांची लागवड केली असून पीक ऑक्टोबरअखेरीस आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. तोपर्यंत ग्राहकांना जास्त भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतील. सध्या कॉटन मार्केटमध्ये गेल्या आठवड्याच्या ३० ते ३५ गाड्यांच्या तुलनेत आवक दुप्पट झाली आहे. पुढे आवक वाढल्यानंतर भाव कमी होतील, अशी माहिती महात्मा फुले सब्जी व फ्रूट मार्केट अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी सांगितले. याशिवाय कळमना सब्जी मार्केटमध्ये लहानमोठ्या १५० गाड्यांची आवक आहे. सध्या दोन्ही ठोक बाजारात शहराला होणाऱ्या पुरवठ्याच्या तुलनेत पुरेशी आवक आहे.
शनिवारी किरकोळमध्ये भाज्यांचे भाव
कोथिंबीर १०० ते १२०, हिरवी मिरची ५०, टमाटर ४०, वांगे २०, सिमला मिरची ७० ते ८०, तोंडले ५०, फूलकोबी ४०, पत्ताकोबी २५ ते ३०, दोडके ४० ते ५०, लवकी ३०, कोहळे ३० ते ३५, चवळी शेंग ४० ते ५०, गवार ५०, चवळी भाजी ४० ते ५०, पालक ३० ते ४०, मेथी ७० ते ८०, परवळ ६० ते ७०, कारले ५०, भेंडी ४० ते ५०, काकळी ३०, गाजर ५०, मुळा ४०.