थंडीमुळे भाज्यांच्या किमतीत वाढ
By Admin | Published: December 30, 2014 12:54 AM2014-12-30T00:54:28+5:302014-12-30T00:54:28+5:30
कडाक्याच्या थंडीचा परिणाम भाज्यांवर झाल्याने स्थानिक उत्पादकांकडून मध्यंतरी वाढलेली आवक सध्या अचानक कमी झाली. परिणामी भाज्यांचे भाव पुन्हा आकाशाला भिडले असून,
आवक घटली : गृहिणींचे बजेट वाढले
नागपूर : कडाक्याच्या थंडीचा परिणाम भाज्यांवर झाल्याने स्थानिक उत्पादकांकडून मध्यंतरी वाढलेली आवक सध्या अचानक कमी झाली. परिणामी भाज्यांचे भाव पुन्हा आकाशाला भिडले असून, ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. हिवाळ्यात भाज्या महाग असल्याचे पहिल्यांदाच घडले आहे. सध्या किरकोळ आणि ठोक बाजारात स्थानिक उत्पादकांकडून भाज्यांची आवक तुलनात्मकरीत्या कमी आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट वाढले आहे. एकंदरीत पाहता किमती अचानक वाढल्याने भाज्या बेचव झाल्याची गृहिणींची प्रतिक्रिया आहे.
जानेवारीत आवक वाढणार
नागपूरपासून ३० ते ४० कि़मी. परिसरात सिंचनाच्या सोयी मोठ्या प्रमाणात झाल्याने भाज्यांचे उत्पादन वाढले आहे. कडाक्याची थंडी आणि ढगाळ वातावरणामुळे सात दिवसानंतर येणारे पीक आधीच आले आहे. मे, जूनमध्ये भाज्यांची लागवड होते आणि दसरा व दिवाळीत भाज्या बाजारात येतात. पण मध्यंतरी आलेल्या पावसामुळे लागवड मोठ्या प्रमाणात झाली. ते पीक नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात जास्त प्रमाणात बाजारात आले. गेल्या वर्षी भाज्यांना जास्त भाव मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली. परिणामी उत्पादनही वाढल्याने मध्यंतरी भाव कमी झाले होते. पण आता वाढीव भावामुळे ग्राहक त्रस्त आहेत. थंडीचा तडाखा कमी झाल्यानंतर जानेवारीत भाज्यांची आवक वाढेल, असे मत महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतला बोलताना व्यक्त केले.
वांगे व पालक स्वस्त
गेल्या काही दिवसांपासूनच्या ढगाळ वातावरणामुळे वांगे, पत्ताकोबी, पालक आणि काही भाज्यांच्या उत्पादनात काहीशी वाढ झाली आहे. ठोक बाजारात भाव मिळत नसल्याने, शिवाय इतर कमिशनला कात्री लावण्याच्या उद्देशाने उत्पादक रस्त्याच्या कडेला मेटॅडोर लावून भाज्या विक्री करीत असल्याचे चित्र दिसत आहे. याशिवाय उमरेड मार्गावरही अनेक उत्पादक भाज्याची विक्री करीत असल्याचे दिसून आले. कॉटन मार्केटमध्ये ठोक बाजारात टमाटर नाशिकहून, मटर व गाजर दिल्ली आणि जबलपूर येथून येत आहेत. कॉटन मार्केट बाजारात दररोज २०० गाड्यांची आवक आहे.
किरकोळमध्ये भाज्या महागच
ठोकमध्ये असलेल्या भावापेक्षा किरकोळमध्ये भाज्यांच्या किमती दुप्पट असतात, असा नेहमीचा अनुभव आहे. हिरवी मिरची, सांबार, गाजर, फूलकोबी, भेंडी, कारले जास्त किमतीत विकल्या जात आहे. त्यावर शासनाने नियंत्रण आणावे, अशी गृहिणींची मागणी आहे.
वडीसाठी सांबार स्वस्त
हिवाळ्यात सांबार स्वस्त असल्याने सांबारवडीचा बेत सर्वांकडेच असतो. यावर्षी ठोक बाजारात १२ ते १५ रुपये किलोदरम्यान भाव आहेत. स्थानिक उत्पादकांकडून आवक वाढली आहे. (प्रतिनिधी)