नागपुरात आकाशाला भिडले भाज्यांचे भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 11:48 PM2018-06-01T23:48:11+5:302018-06-01T23:48:11+5:30
यावर्षी भीषण गर्मी आणि लगतच्या राज्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नागपूरलगतच्या भागातून आणि अन्य शहरांतून सध्या भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्याचा थेट परिणाम भाज्यांच्या किमतीवर पडला आहे. महाग भाज्यांची खरेदी शक्य नसल्यामुळे गृहिणी कडधान्याचा जास्त उपयोग करीत आहेत. किरकोळ बाजारात भाज्यांच्या भावात ४५ ते ५५ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर दुसरीकडे ठोक बाजारात भाजीपाला ३० टक्के महाग झाल्याची माहिती कॉटन मार्केट भाजीबाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यावर्षी भीषण गर्मी आणि लगतच्या राज्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नागपूरलगतच्या भागातून आणि अन्य शहरांतून सध्या भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्याचा थेट परिणाम भाज्यांच्या किमतीवर पडला आहे. महाग भाज्यांची खरेदी शक्य नसल्यामुळे गृहिणी कडधान्याचा जास्त उपयोग करीत आहेत.
किरकोळ बाजारात भाज्यांच्या भावात ४५ ते ५५ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर दुसरीकडे ठोक बाजारात भाजीपाला ३० टक्के महाग झाल्याची माहिती कॉटन मार्केट भाजीबाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली.
नागपुरात स्थानिक आणि बाहेरील उत्पादकांकडून आवक अर्ध्यावर आली आहे. पूर्वी कॉटन मार्केटमध्ये भाज्यांच्या लहानमोठ्या १५० ते १७५ गाड्या येत होत्या. पण सध्या आवक ६० ते ७० गाड्यांपर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे भाज्या ३० टक्के महागल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मे महिन्यात भाव कमीच आहेत. यावर्षी तपत्या उन्हातही प्रारंभी स्थानिक उत्पादकांकडून आवक चांगली होती. पण १५ मेनंतर स्थिती बदलली. भाज्यांची आवक कमी असल्यामुळे भाव वाढतातच. सध्या ओडिशा, दक्षिण भारत, मुलताई, संगमनेर, छिंदवाडा, नांदेड या भागातून भाज्यांची आवक आहे.
महाजन म्हणाले, यावर्षी पाऊस वेळेवर येण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. अंदाज खरा ठरल्यास शेतींची कामे लवकर पूर्ण होऊन भाज्यांची आवक जुलैच्या अखेरपर्यंत वा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात येण्याची अपेक्षा आहे. तोपर्यंत गृहिणींना भाज्या महागच खरेदी कराव्या लागतील.
किरकोळमध्ये भाज्या महागच
कॉटन मार्केटमधून भाज्या खरेदी करून गल्लीबोळात आणि किरकोळ बाजारात विक्री करणाºया विक्रेत्यांकडे भाज्या महागच असतात. विविध भागात ज्यांची अस्थायी वा पक्की दुकाने आहेत, ते विक्रेते नफा जोडून विक्री करीत आहेत. त्यांचा नफा २० ते २५ टक्के असतो. अशा स्थितीत कॉटन मार्केटमध्ये भावात ३० टक्क्यांची वाढ झाल्यानंतर किरकोळमध्ये ग्राहकांना ४५ ते ५५ टक्के जास्त भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतात.
दुधाची आवक कमी होण्याचा अंदाज
सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या विरोधात शुक्रवारी कन्हान भागात दूध उत्पादक शेतकºयांनी कॅनमधून दूध रस्त्यावर ओतले. हे आंदोलन मोठे होण्याच्या शक्यतेने पुढील काही दिवसात नागपुरात दुधाची टंचाई होऊन दर वाढू शकतात.
कॉटन मार्केटमध्ये भाव
भाजीपाला भाव (किलो)
टोमॅटो १५-२० रु.
फुलकोबी २० रु.
वांगे २० रु.
हिरवी मिरची ३० रु.
कोथिंबीर ४०-५० रु.
सिमला मिरची ३०-४० रु.
भेंडी ३०-४० रु.
टोंडले ५० रु.
बीन्स ४० रु.
कोहळे २० रु.
कारले ४० रु.
कैरी ३० रु.
(किरकोळ बाजारात भाव २० ते २५ टक्के जास्त असू शकतात.)