भाज्यांच्या किमती घसरल्या
By admin | Published: November 17, 2014 12:54 AM2014-11-17T00:54:44+5:302014-11-17T00:54:44+5:30
सध्या किरकोळ आणि ठोक बाजारात स्थानिक उत्पादकांकडून भाज्यांची आवक वाढल्याने भाव आधीच्या तुलनेत कमी आहेत. गृहिणींचे महिन्याचे बजेट आटोक्यात आहे. एकंदरीत पाहता किमती घसरल्याने
स्थानिकांची आवक वाढली : सामान्यांच्या आटोक्यात
नागपूर : सध्या किरकोळ आणि ठोक बाजारात स्थानिक उत्पादकांकडून भाज्यांची आवक वाढल्याने भाव आधीच्या तुलनेत कमी आहेत. गृहिणींचे महिन्याचे बजेट आटोक्यात आहे. एकंदरीत पाहता किमती घसरल्याने भाज्या चविष्ट झाल्याची गृहिणींची प्रतिक्रिया आहे.
किरकोळमध्ये काही भाज्या महागच
ठोकमध्ये असलेल्या भावापेक्षा किरकोळमध्ये भाज्यांच्या किमती दुप्पट असतात, असा नेहमीच अनुभव आहे. हिरवी मिरची, सांबार, गाजर, भेंडी, कारले जास्त किमतीत विकल्या जात आहे. सामान्यांना हवी असलेली फुल कोबी, पत्ता कोबी, पालक, मेथी, वांगे स्वस्तात आहेत.
सिंचनाच्या सोयी वाढल्या
नागपूरपासून ३० ते ४० कि़मी. परिसरात सिंचनाच्या सोयी मोठ्या प्रमाणात झाल्याने भाज्यांचे उत्पादन वाढले आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे सात दिवसानंतर येणारे पीक आधीच आले आहे. तसे पाहता मे, जूनमध्ये भाज्यांची लागवड होते आणि दसऱ्याला भाज्या बाजारात येतात. पण मध्यंतरी आलेल्या पावसामुळे लागवड मोठ्या प्रमाणात झाली. ते पीक आता बाजारात येत आहे.
गेल्यावर्षी भाज्यांना जास्त भाव मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली. परिणामी उत्पादनही वाढल्याने भाव कमी आहेत. यंदा भाज्यांची स्वस्ताई फेब्रुवारीपर्यंत राहील, अशी माहिती महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतला दिली.
फुल कोबी व पालक स्वस्त
गेल्या काही दिवसांपासूनच्या ढगाळ वातावरणामुळे भाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आले आहे. ठोक बाजारात भाव मिळत नसल्याने, शिवाय इतर कमिशनला कात्री लावण्याच्या उद्देशाने उत्पादक रस्त्याच्या कडेला मेटॅडोर लावून भाज्या विक्री करीत असल्याचे चित्र सक्करदरा चौक आणि ग्रेट नाग रोडवर दिसत आहे.
याशिवाय उमरेड मार्गावरही अनेक उत्पादन भाज्याची विक्री करीत असल्याचे दिसून आले. फुल कोबी, पत्ता कोबी, पालक, मुळा आदींची विक्री सुरू आहे.
कॉटन मार्केट आणि कळमना ठोक बाजारात टमाटर नारायणगाव, मगनफल्ली, संगमनेर व नाशिकहून येत आहे. गोंदिया आणि भंडाऱ्यातून भेंडी, छिंदवाडा व औरंगाबाद येथून फुलकोबी आणि परतवाडा, जगदलपूर, रायपूर येथून हिरवी मिरची तर छिंदवाडा व नांदेड येथून सांबार येत आहे.
स्थानिक उत्पादकांकडून चवळी भाजी, पालक, भेंडी, हिरवी मिरची, सांबार, पत्ता कोबी आणि फूल कोबीची आवक आहे. कॉटन मार्केट बाजारात दररोज २०० गाड्यांची आवक आहे. (प्रतिनिधी)