भाज्यांनी गणित बिघडवले; ठोकमध्ये आटोक्यात, घराजवळ मात्र महागच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 01:53 PM2023-05-29T13:53:24+5:302023-05-29T13:57:12+5:30

स्वयंपाकघराचे बजेट वाढले : कोथिंबीर १००, अद्रक २५० रुपये किलो

Vegetable prices soar due to unseasonal rains and heat | भाज्यांनी गणित बिघडवले; ठोकमध्ये आटोक्यात, घराजवळ मात्र महागच

भाज्यांनी गणित बिघडवले; ठोकमध्ये आटोक्यात, घराजवळ मात्र महागच

googlenewsNext

नागपूर : भाज्यांची आवक स्थानिक शेतकऱ्यांकडून न होता नागपूर जिल्ह्याबाहेरून आणि अन्य राज्यांतून होत आहे. त्यामुळे दर आटोक्याबाहेर गेले आहेत. सध्या महागाईचा चांगलाच भडका उडाला असून, भाज्यांनी गृहिणींचे आर्थिक बजेट बिघडले आहे.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाज्यांची आवक कमी झाल्याने किमतीत वाढ झाली आहे. किरकोळमध्ये कोथिंबीर १००, तर अर्द्रक २५० रुपयांपर्यंत वधारले आहे. कळमना आणि उपबाजार कॉटन मार्केटमध्ये भाज्यांच्या किमती आटोक्यात आहेत; पण किरकोळ बाजारात जवळजवळ दोन ते तीन पटीने दरवाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

काही आठवड्याआधी संततधार पावसामुळे शेतातील भाजीपाला खराब झाला आहे. त्याचा पुरवठ्यावर परिणाम झाला आणि भाव वाढले. दर्जाही घसरला आहे. नागपूरच्या सर्व बाजारात हेच चित्र आहे. काही दिवसांआधी उन्हाचा तडाखा वाढल्याने भाज्यांची आवक वाढल्याचे महात्मा फुले फ्रूट व सब्जी आडतिया असोसिएशनचे (कॉटन मार्केट) सचिव राम महाजन यांनी सांगितले.

हिरवी मिरची, कोथिंबीर, भेंडी, कारले, मेथी, दोडके, फणस या भाज्यांचे भाव वाढले असून, किरकोळमध्ये ७० ते १०० रुपयांदरम्यान आहेत. टोमॅटोचे भाव ३० रुपयांपर्यंत उतरले आहेत. किरकोळमध्ये वांगे, फूल कोबी आणि कोहळ्याचे भाव ३० ते ४० रुपयांदरम्यान आहेत. महागाईच्या काळात वाढलेल्या भाज्यांच्या दराची चिंता सर्वांना सतावत आहे.

भाजीपाला ठोक भाव किरकोळ भाव :

  • वांगे : १५ - ३०
  • हिरवी मिरची : ३० - ६०
  • कोथिंबीर : ६० - १००
  • टोमॅटो : १५ - ३०
  • फूल कोबी : १५ - ३०
  • पत्ता कोबी : १५ - ३०
  • वाल शेंगा : ३५ - ७०
  • भेंडी : ३० - ६०
  • ढेमस : ४० - ६०
  • कारले : ३० - ६०
  • चवळी शेंग : १५ - ३०
  • गवार शेंग : २५ - ५०
  • पालक : १५ - ३०
  • मेथी : ६० - १००
  • कोहळं : २० - ३०
  • फणस : ४० - ६०
  • कैरी : ४० - ६०

कांदे-बटाटे स्वस्त

  • मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त असल्यामुळे कळमन्यात कांदे आणि बटाट्याचे भाव उतरले आहेत. पण किरकोळमध्ये विक्रेते जास्त भावातच विक्री करीत आहेत. आता भाव कमी होणार नाहीत, असे विक्रेते भावेश वसानी यांनी सांगितले.
  • कळमना बाजारात दररोज पांढरे आणि लाल कांद्याचे ३० ते ३५ ट्रक येत आहेत. लाल कांद्याची आवक बुलढाणा, जळगाव आणि विदर्भातून होत आहे. पांढरे कांदे आकोट, अंजनगाव, परतवाडा, अमरावती येथून आवक होते.
  • हलक्या आणि चांगल्या प्रतिचे पांढरे कांदे ७ ते १२ रुपये, लाल कांदे ४ ते १० रुपये किलो आहेत. मध्यम दर्जाच्या कांद्याची सर्वाधिक विक्री होते. तसेच बटाट्याचे भावही कमी झाले आहेत. कोल्ड स्टोरेजच्या बटाट्याचे दर १० ते १३ रुपये आहेत. दररोज २५ ट्रकची आवक कानपूर, अलाहाबाद आणि आग्रा येथून होत असल्याचे भावेश म्हणाले. किरकोळमध्ये भाव दुप्पट आहेत.

Web Title: Vegetable prices soar due to unseasonal rains and heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.