नागपूरच्या कांशीनगरातील भाजीविक्रेत्यांनी केली पर्यायी जागेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 10:28 PM2020-02-28T22:28:19+5:302020-02-28T22:28:39+5:30
कांशीनगर स्वयंरोजगार समितीअंतर्गत शुक्रवारी संविधान चौकात भाजीविक्रेत्यांनी प्रतिकात्मक भाजी विकून त्यांच्यावरील कारवाईचा निषेध केला. तसेच येथील भाजीविक्रेत्यांना महापालिकेने पर्यायी स्थायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कांशीनगर येथे रस्त्यावर भरणाऱ्या आठवडी बाजाराला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. सोबतच रस्त्यावर दुकान लावत असल्याने महापालिकेकडूनही कारवाई केली जात आहे. मागील काही आठवड्यांपासून ही कारवाई तीव्र झाली आहे. त्यामुळे आठवडी बाजारात भाजीविक्री करणाऱ्यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. कांशीनगर स्वयंरोजगार समितीअंतर्गत शुक्रवारी संविधान चौकात भाजीविक्रेत्यांनी प्रतिकात्मक भाजी विकून त्यांच्यावरील कारवाईचा निषेध केला. तसेच येथील भाजीविक्रेत्यांना महापालिकेने पर्यायी स्थायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
समितीच्या अध्यक्ष अलका कांबळे यांच्या नेतृत्वात भाजीविक्रेत्यांनी आंदोलन केले. कांबळे यांनी यावेळी सांगितले, २००६ पासून कांशीनगर येथे आठवडी बाजार भरतो आहे. हा बाजार रस्त्यावरच भरत असल्याने ये-जा करणाऱ्या लोकांना त्रास होतो. तेव्हापासूनच आम्ही महापालिकेला पर्यायी जागेची मागणी करीत आहोत. परंतु कुणीही लक्ष दिले नाही. या ठिकाणी ३५० भाजीविक्रेते आहे. हेच त्याचे रोजगाराचे एकमेव साधन आहे. तेच हिरावण्याचा प्रयत्न केला जात आहे. यांनाही रस्त्यावर बसायचे नाही. परंतु त्यांना पर्यायी जागा तर उपलब्ध करायला हवी. याच परिसरात खसरा नंबर ५१-१, ५१-२ मौजा बाबुलखेडा ही बाजारपेठेसाठी राखीव जागा आहे. त्या ठिकाणी यांना स्थायी बसविण्यात यावे. यासाठी मनपाने पुढाकतार घएऊन भाजीविक्रेत्यांशी समन्वय साधून ही कारवाई करावी. भाजीविक्रेत्यांची उपासमार होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी केली.
आंदोलनात सुरेंद्र मस्के, शोभा भगत, माला मस्के, अनसूया सुलतान, नितीन नकाते, गजानन चौहान यांच्यासह मोठ्या संख्येने भाजीविक्रेते सहभागी झाले होते.