यंदा उन्हाळ्यात भाज्या स्वस्तच!
By मोरेश्वर मानापुरे | Published: May 2, 2024 08:25 PM2024-05-02T20:25:02+5:302024-05-02T20:25:29+5:30
घाऊकच्या तुलनेत किरकोळमध्ये महाग : अनेकांची घाऊक बाजाराकडे धाव, पावसामुळे आवक वाढली
माेरेश्वर मानापुरे, नागपूर : जीवनावश्यक वस्तू, धान्य व कडधान्याच्या महागाईचा चांगलाच भडका उडाला असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र यंदा उन्हाळ्यात भाजीपाला स्वस्तच आहे. त्यामुळे गृहिणींच्या बजेटवर फारच ताण आलेला नाही. तसे पाहिल्यास घाऊक बाजाराच्या तुलनेत किरकोळमध्ये भाज्यांचे दर दुप्पट आणि तिप्पट असतात. त्यामुळेच काही ग्राहकांनी कॉटन मार्केटकडे धाव घेतली आहे. किरकोळमध्ये कोथिंबीर ६० तर हिरव्या मिरचीचे भाव प्रति किलो ५०० रुपये आहेत. यंदा पावसामुळे भाज्यांना संजीवनी मिळाली. याच कारणामुळे पुढे भाव कमी होतील.
पावसामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाज्यांची आवक कमी झाल्याने किमतीत वाढ झाली. पण सध्या भाव उतरले आहेत. कळमना आणि उपबाजार कॉटन मार्केटमध्ये भाज्यांच्या किमती नियंत्रणात आहेत. तुलनेत किरकोळमध्ये दोन-तीन पटीने वाढ झाली आहे. सध्या स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांकडून भाज्यांची ७० टक्के आवक आहे.
दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात भाज्यांचे भाव गगनाला पोहोचतात. पण यंदा पावसामुळे शेत हिरवेगार आहेत. शिवाय घाऊकमध्ये भाज्यांच्या किमतही घसरण झाली आहे. याउलट किरकोळ विक्रेते पावसामुळे भाज्यांची दरवाढ झाल्याचे कारण देत असून भाज्या शेतातच खराब झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पावसामुळे काही भाज्यांची दर्जा घसरला आहे. तसे पाहता पावसामुळे भाजीपाल्यांच्या पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. शेतात भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. ऊनाचा तडाखा वाढल्यानंतर भाज्यांची आवक वाढेल आणि भाव कमी होतील, असे मत महात्मा फुले फ्रूट व सब्जी आडतिया असोसिएशनचे (कॉटन मार्केट) सचिव राम महाजन यांनी व्यक्त केले.
किरकोळमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, भेंडी, कारले, गवार, पालक, मेथी, फणस या भाज्यांचे भाव ५० ते ७० रुपयांदरम्यान आहेत. यंदा टोमॅटो आटोक्यात असून २० ते २५ रुपये किलो आहेत. महागाईच्या काळात किरकोळमध्ये अचानक वाढलेल्या भाज्यांच्या दराची चिंता सर्वांना सतावत आहे. लवकरच दर कमी व्हावेत, अशी ग्राहकांना अपेक्षा आहे.
टोमॅटो स्थानिक उत्पादकांसह बेंगळुरू, मदनपल्ली येथून तर सिमला मिरची, परवळ, कारले, तोंडले रायपूर, भिलाई, दुर्ग येथून विक्रीला येतात. कोथिंबीर स्थानिकांकडून आणि नाशिक तसेच जगदलपूर आणि मौदा येथून हिरवी मिरची विक्रीस येत आहे.
भाजीपाला ठोक भाव किरकोळ भाव :
वांगे १० २०
हिरवी मिरची २५ ४०
कोथिंबीर ३५ ५०
टोमॅटो १२ २५
फूल कोबी १८ ३०
पत्ता कोबी ८ १५
भेंडी २५ ५०
कारले ३० ५०
चवळी शेंग१५ ३०
गवार शेंग २५ ५०
पालक ८ १५
मेथी ३० ५०
कोहळ १० २०
फणस ४० ६०
कैरी २५ ४०
परवळ ३० ५०
तोंडले २० ४०
दोडके ३० ५०
काकडी १५ २०
मुळा १० २५
गाजर २५ ४०