महागाईत ठोकमध्ये भाज्या स्वस्त; पण किरकोळमध्ये भाव दुप्पट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:12 AM2021-08-23T04:12:04+5:302021-08-23T04:12:04+5:30
नागपूर : गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या स्थानिक शेतकऱ्यांकडून भाज्यांची आवक वाढल्याने ठोक बाजारात भाव कमी आहेत, पण किरकोळमधील गृहिणींना ...
नागपूर : गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या स्थानिक शेतकऱ्यांकडून भाज्यांची आवक वाढल्याने ठोक बाजारात भाव कमी आहेत, पण किरकोळमधील गृहिणींना दुप्पट भावातच भाज्या खरेदी कराव्या लागत आहे. भाज्यांच्या लागवडीला पावसामुळे खतपाणी मिळाले आणि उन्हामुळे मोठ्या प्रमाणात पीक आले आहे. ठोक बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
गेल्या आठवड्यात ठोकमध्ये २० रुपये किलो विकल्या गेलेले वांगे रविवारी ८ ते १० रुपये, ८० रुपये किलो कोथिंबीर ३० ते ४० रुपये, २० रुपये किलो पालक ५ ते १०, ८० रुपये किलो मेथी ४० रुपये, २० रुपये किलो पत्ताकोबी १० रुपये, याशिवाय अन्य भाज्यासुद्धा स्वस्त झाल्या आहेत. जवळपास ९० टक्के ग्राहक किरकोळ बाजारातून भाज्यांची खरेदी करतो. त्यामुळे त्यांच्यासाठी भाज्या अजूनही महागच आहेत. वाढत्या महागाईत लोकांना भाज्यांच्या जास्त भावाची झळ अजूनही सोसावी लागत आहे.
महात्मा फुले सब्जी व फ्रूट मार्केट (कॉटन मार्केट) अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन म्हणाले, भाज्यांची आवक वाढल्याने दोन महिन्यांच्या तुलनेत भाव कमी झाले आहेत, पण पावसामुळे भाज्यांचा दर्जा खराब झाला आहे. आता स्थानिकांसह अन्य जिल्हे आणि राज्यातूही आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कॉटन मार्केटमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या आवक दुप्पट अर्थात १२० लहानमोठ्या गाड्यांची आहे. सध्या औरंगाबाद व नाशिकहून फूलकोबी, पंढरपूर, नाशिक, औरंगाबाद, नाशिक व मध्य प्रदेशातील उमरानाला, सौंसर येथून कोथिंबीर, बुलडाणा येथून सिमला मिरची, हिरवी मिरची, फूलकोबी विक्रीला येत आहे. आवकीच्या तुलनेत विक्री कमी असल्याने ठोकमध्ये भावात घसरण दिसून येत आहे. याशिवाय सणांमुळे हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये ग्राहकी कमी असल्याने भाज्यांचा उठाव कमी आहे.
किरकोळ बाजारात भाज्यांचे किलो भाव :
वांगे २० रुपये, फूलकोबी ४०, पत्ताकोबी ३०, हिरवी मिरची ४०, कोथिंबीर ६०, टोमॅटो २०, चवळी शेंग २५-३०, गवार ३०-४०, भेंडी ४०, कारले ४०, सिमला मिरची ४०, कोहळे ३०, लवकी २०, परवळ ४०-५०, ढेमस ४०-५०, पालक २०, मेथी ६०-८०, चवळी ३०-४०, गाजर ४०, मुळा २०, काकडी २०.